– स्वयंसहायता बचत गटातील महिलांना धनादेशाचे वितरण
The गडविश्व
चंद्रपूर : कोरोनाच्या संकटाने अनेकांच्या आयुष्याची होळी केली. या काळात जिल्ह्यात कोरोनामुळे हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. घरातील कर्ता व्यक्ती गमाविल्याने अनेकांचे आयुष्य अंधकारमय झाले.मात्र,कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला उभे करण्यासाठी माविमने रोजगाराभिमुख प्रकल्प उभारावे, असे प्रतिपादन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
नियोजन भवन येथे आयोजित सह्याद्री फांऊडेशन, नागपुर व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने कोविड-19 मुळे घरातील प्रमुख कर्ता पुरुष गमाविलेल्या महिला स्वयंसहायता बचत गटातील महिलांना धनादेश वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, सह्याद्री फाऊंडेशनचे विजय क्षीरसागर, महिला आर्थिक विकास महामंडळाचे वरिष्ठ जिल्हा समन्वयक अधिकारी नरेश उगेमुगे, प्रकाश देवतळे, रामू तिवारी आदी उपस्थित होते.महिलांनी खचून न जाता या संकटातून सावरून पुढे जावे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, दोन वर्षात जगाला व देशाला हादरवून टाकणाऱ्या कोविड च्या प्रादुर्भावामुळे होत्याचं नव्हतं झालं, कोविडचे संकट फार मोठे होते. मात्र, आता या संकटातून बाहेर पडलो आहो, कोरोनाची लाट बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. सह्याद्री फाऊंडेशनने पुढे येऊन घरातील कर्ता पुरुष गमाविलेल्या बचत गटातील महिलांना आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न अभिनंदनीय आहे. जिल्ह्यातील दोनशे महिलांना या फाउंडेशनच्या माध्यमातून 30 हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात येत आहे. या अर्थसहाय्यातून महिलांना स्वयंरोजगारासाठी छोटा उद्योग व व्यवसाय सुरू करण्यास मदत मिळेल व कुटुंबाला हातभार लागेल. असे ते म्हणाले.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, कोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबाला उभे करण्यासाठी सह्याद्री फाऊंडेशन व महिला आर्थिक विकास महामंडळाने रोजगाराभिमुख प्रकल्प ऊभारावे, जेणेकरून कायमस्वरूपी रोजगार महिलांना देता येईल. यासाठी पाहिजे तो निधी उपलब्ध करून दिल्या जाईल. कार्पेट निर्मितीचे मोठे युनिट जिल्ह्यात तीन ठिकाणी सुरू आहेत. ब्रह्मपुरी येथे गारमेंट क्लस्टर तर सावली येथे कार्पेट क्लस्टर सुरू करण्यात आले आहे. अशा ठिकाणी या महिलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. काही महिलांना स्वयंरोजगारासाठी महामंडळाकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. असेही ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते कोविड-19 मुळे घरातील प्रमुख कर्ता पुरुष गमाविलेल्या महिला स्वयंसहायता बचत गटातील 132 महिलांना 30 हजार रुपये आर्थिक सहाय्याचे धनादेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला स्वयंसहाय्यता बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.