The गडविश्व
नागपूर : चोरी केलेला कोळसा वेगवेगळ्या ठिकाणी साठवून तस्करी करणाऱ्या आरोपींच्या कन्हान पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी ९ जणांना अटक करून त्यांच्याकडून १ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा ३१ टन कोळसा जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये मिथून मणी नडार (३५), मनीष सिंग (३२), विक्की यादव (२७), सर्व रा. कन्हान, ता. पारशिवनी), कुणाल गणपत काटाेके (३०), भुजंग जनार्दन महल्ले (४५, तिघेही रा. टेकाडी-कन्हान, ता. पारशिवनी, बादल अशाेक चाैरे (३०), आकाश चाैरे (३२), उमेश पाणतावने (सर्व रा. कांद्री-कन्हान, ता. पारशिवनी व मंगलसिंग मेहरी (४०), रा. समतानगर, नागपूर) या नऊ जणांचा समावेश आहे.
कन्हान परिसरातील वेकाेलीच्या काही खाणीच्या डम्पिंग यार्ड व ट्रकमधून काेळसा चाेरीला जाण्याचे प्रकार सामान्य झाले आहे. चाेरून नेलेला ताे काेळसा कन्हान परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी साठवून ठेवण्यात आल्याची माहिती गस्तीवर असलेल्या कन्हान पाेलिसांच्या पथकाला मिळाली हाेती. त्यामुळे या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी काळजीपूर्वक धाडी टाकून काेळसा चाेरणाऱ्या, ताे साठवून ठेवत गुप्तपणे विकणाऱ्या नऊ जणांना टप्प्याटप्प्याने ताब्यात घेत विचारपूस केली. दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली देताच त्यांना कटक करून त्यांच्याकडील चाेरीचा काेळसा जप्त केला. या कारवाईमध्ये नऊ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण ३१ टन काेळसा जप्त केल्याची तसेच त्या काेळशाची एकूण किंमत १ लाख ५५ हजार रुपये असल्याची माहिती ठाणेदार विकास काळे यांनी दिली. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक शेख यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.