-जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दाखवली हिरवी झेंडी – केंद्र शासन व पिरामल संस्थेच्या सहयोगाने ‘आश्वासन’ मोहिमेला जिल्हयात सुरुवात
The गडविश्व गडचिरोली : कोविड आणि टीबी आजारांच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठीच्या “आश्वासन” मोहीमेला आज गडचिरोली जिल्हयात सुरूवात झाली. या मोहिमेतील वाहनांना जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी हिरवी झेंडी दाखविली. देशात १०० दिवसांत १०० जिल्हयांमध्ये “आश्वासन” मोहीम शासनाच्या व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून राबविली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ०६ आदिवासी बहुल तालुक्यांमध्ये प्रचार वाहनांद्वारे पिरामल संस्थेच्या वतीने जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. लोकांमधील कोविड लसीबद्दलचे गैरसमज आणि संकोच दूर व्हावा आणि सर्वसामान्यांना कोविड अनुकूल वर्तन अंगीकारण्यास प्रोत्साहित करता यावे यासाठी सहा तालुक्यात कामे केली जाणार आहेत. यामध्ये संस्थेकडून आदिवासी लोकसंख्या 25 टक्के पेक्षा जास्त असलेल्या अहेरी, भामरागड, एटापल्ली, धानोरा, कोरची व कुरखेडा या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.
यासोबतच क्षयरोगाच्या संभाव्य रूग्णांची गावपातळीवर शोध मोहिमेद्वारे लक्षणांच्या आधारे थुंकीची तपासणी केली जाईल आणि रोगाची खात्री पटल्यावर शासनाकडून मोफत क्षयरोग उपचार उपलब्ध करून दिले जातील. जेणेकरून संसर्गजन्य क्षयरोग आजार बरा होईल. लोकांना चाचणीसाठी सरकारी आरोग्य केंद्रात जाण्याची गरज भासणार नाही, तपासणीसाठी त्यांच्या घरातूनच नमुने सदर मोहमेचे सदस्य घेऊन जातील. समाजाच्या सहभागाचा पैलू लक्षात घेऊन गाव टीबीमुक्त व्हावे आणि लोकांना टीबीबाबत प्रबोधन करता यावे यासाठी मोहिमेदरम्यान ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रभावशाली लोक आणि पारंपरिक डॉक्टरांचीही मदत घेण्यात येणार आहे.
यू.एस.एड. पिरामल हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अर्थसहाय्याने हा प्रकल्प संबंधित विभागाच्या मदतीने जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी संजय मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संजय जठार व जिल्हा क्षयरोग अधिकारी पंकज हेमके, पिरामल हेल्थचे झोनल प्रोग्रॅम लीड मोहन मालवीय आणि जिल्हा कार्यक्रम प्रमुख राहुल बर्चे उपस्थित होते.