– नक्षली पत्रके व बॅनर बांधून सरकारवर केली टीका
The गडविश्व
गोंदिया : जिल्ह्यातील सालेकसा पोलीस ठाणेपासून अवघ्या १ किमी अंतरावर नक्षल्यांनी बॅनर लावून चक्क एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शविल्याची घटना काल मंगळवार २५ जानेवारी रोजी उघडकीस आली. तसेच जागोजागी पत्रके टाकली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या लक्षात येताच ते बॅनर वेळीच काढून घेण्यात आले. या भागात सालेकसा-दरेकसा दलम कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांत नक्षल्यांचा प्रभाव कमी झाल्याचे बोलले जात होते पण या घटनेने नक्षली पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.
या घटनेमुळे पोलिसांनी परिसरात सर्च मोहीम सुरू केली आहे. भारताची कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड स्पेशल झोनल कमिटीच्यावतीने पत्रक काढण्यात आले आहे. अनंत नावाच्या झोनल प्रवक्त्याची त्यात सही आढळून येत आहे. २१ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे; परंतु मुख्यमंत्री ठाकरे या समस्यांकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप या पत्रकात करण्यात आला आहे. परिवहन मंत्री संप सोडविण्यासाठी एकीकडे बैठका घेतात. तर दुसरीकडे संप चिरडून टाकण्यासाठी प्रयत्न करतात. कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले जात आहे. लाठीचार्ज केले जात आहे. पगारात ४१ टक्के वाढ तसेच दर महिन्याच्या ८ तारखेला पगार देण्याचे आमिष दाखविण्यात येत आहे, असा आरोप पत्रकातून करण्यात आला आहे.
