– किडनी काढून महिलेला सोडले वाऱ्यावर
The गडविश्व
पुणे : पैशांचे आमिष दाखवून महिलेची किडनी काढल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. मूळची कोल्हापूरची असलेल्या एका महिलेने या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
या महिलेची एका रवी नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली होती. या रवीने त्यांना एका रुग्णासाठी किडनी देण्याबाबत विचारणा केली. त्यासाठी पीडीत महिला तयार झाली. त्यासाठी त्यांना 15 लाख रुपये देण्याचा देखील ठरले. रुग्णाच्या कुटुंबातील किंवा नातेवाईकांकडून किडनी घेऊन ती प्रत्यारोपण करण्यात जास्त अडचण येत नाही. मात्र नातेवाईक नसलेल्या व्यक्तीची किडनी काढण्याबाबत कठोर निर्बंध आहेत. पीडित महिलेला बनावट कागदपत्रांच्या आधारे संबंधित रुग्णाची नातेवाईक दाखवण्यात आले आणि त्यांची किडनी काढून घेण्यात आली.
पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये शस्त्रक्रिया पार पडली. मात्र त्यानंतर संबंधित महिलेला ठरल्याप्रमाणे पैसे मिळाले नाहीत व आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. रुबी हॉस्पिटलकडून देखील पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून शहरात किडनी तस्करीचे रॅकेट असल्याची चर्चा आहे. दरम्यान या प्रकरणाची जिल्हा अवयव प्रत्यारोपण समितीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे.