गडचिरोलीतील ध्येयवेड्या चेतनची ॲनिमेशन क्षेत्रात यशस्वी वाटचाल

1761

The गडविश्व
गडचिरोली : आजच्या काळात प्रत्येकाला वेगळ्या क्षेत्रात करिअर करायचे आहे. पण वेगळ्या क्षेत्रात करिअर करतांना आपल्या आवडीचा म्हणजेच अभिरुचीचा विचार करून क्षेत्र निवडणे आवश्यक आहे. गडचिरोलीतील चेतन उरकुडे यांनी ॲनिमेशन चे वेगळे क्षेत्र निवडले व त्यात त्यांची वाटचाल ही यशस्वी ठरली. चेतनला वयाच्या सातव्या वर्षी पासूनच चित्रकलेची आवड होती. हळूहळू रंग रेषांशी खेळता खेळता चेतनला चालत्याबोलत्या चित्रांचा लढा लागला. वयाच्या १४ व्या वर्षी एका प्रवासादरम्यान त्याला एका सहप्रवास्याने ॲनिमेशन क्षेत्रात काम करत असल्याचे सांगितले. त्याने क्रीश चित्रपटासाठी ॲनिमेशन केले असल्याचेही सांगितले. चेतन ने त्या सहप्रवासीकडून ॲनिमेशन क्षेत्राविषयी आणखीन माहिती जाणून घेतली. चेतनला असलेली चित्रकलेची आवड व रंगसंगतीच्या ज्ञानामुळे त्याने ॲनिमेशन क्षेत्रात करिअर करायचे ठरवले. बारावी झाल्यानंतर चेतनने नागपूरच्या मॅक ( माया अकॅडमी ऑफ ॲडव्हान्स सिनेमॅटिक) येथे ॲनिमेशन चे शिक्षण घेतले. सध्या चेतन मुंबईच्या इनहॅबिट टेक्नोलॉजीज या कंपनीमध्ये कार्यरत आहे. चेतनला ॲनिमेशन क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. सुरुवातीपासूनच चेतनला गडचिरोली येथील विद्यार्थ्यांना ॲनिमेशनचे मूलभूत शिक्षण मिळावे यासाठी स्वतःचे ॲनिमेशन स्टुडिओ सुरू करण्याचे स्वप्न होते. त्याने त्याचे स्वप्न स्वबळावर साकार केले. फक्त स्वतःचे स्वप्न नाही तर दुसऱ्यांच्या स्वप्नांना पंख मिळावे म्हणून त्याने गडचिरोली येथे ॲनिमॅटो टॅटू अँड आर्ट्स कोचिंग स्टुडिओ सुरू केले.
चेतन उरकुडे म्हणतात,
” ॲनिमेशन म्हणजे निर्जीव गोष्टीत प्राण ओतणे. ॲनिमेशन ही एक प्रभावी कला आहे. ॲनिमेशनचे क्षेत्र निवडतांना चित्रकलेची आवड, रंग- संगती चे ज्ञान, निरीक्षण क्षमता ,कल्पनाशक्ती, भाषेवरील प्रभुत्व, संवाद कौशल्य, सांघिक काम करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. या क्षेत्रात आज अनेक संधी उपलब्ध आहेत. जाहिरात, सिने-नाट्य, चित्रपट सृष्टीला ,प्रिंट मीडियाला कुशल ॲनिमेटरची मोठी गरज आहे. आपली आवड लक्षात घेऊन करिअरचा पर्याय निवडला व निवडलेल्या करियरला जिद्द, चिकाटी व कष्टाची जोड दिली तर यश नक्की आपल्या पदरी पडेल”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here