The गडविश्व
गडचिरोली, २५ ऑगस्ट : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अत्याधुनिक अतिदक्षता विभागाचे, तत्कालीन पालकमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन होवून दोन वर्षे उलटल्यानंतरही फायर ऑडिटच्या नावाखाली बंद आहे, हे अतिदक्षता विभाग तातडीने सुरू करुन जिल्ह्यातील जनतेला सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी आज विधानपरिषदेत केली.
उल्लेखनीय की, गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात राज्यातील अत्याधुनिक अतिदक्षता विभागाची निर्मिती लाखो रुपये खर्चून करण्यात आली. त्याचे उद्घाटन तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले, मात्र दोन वर्षांचा कालावधी लोटूनही तो सुरू होवू शकला नसल्याने शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्री वेळदा यांनी १६ जून रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतरही सदरचे अतिदक्षता विभाग जनतेसाठी सुरू होवू शकले नव्हते.
आज याबाबत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करतांना भाई जयंत पाटील यांनी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रुडे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील व्याहाड येथे राष्ट्रीय महामार्गाजवळ विकत घेतलेल्या दहा एकर जमीनीशी या अतिदक्षता विभागाच्या भ्रष्टाचाराशी काही संबंध आहे काय याचीही शासनाने चौकशी करावी, अशीही मागणी केली.
गडचिरोलीत अतिदक्षता विभाग सुरू करा : भाई जयंत पाटील यांची विधानपरिषदेत मागणी pic.twitter.com/DlqrPf83wb
— THE GADVISHVA (@gadvishva) August 25, 2022