– १,३३,६६५ लाभार्थांचे बूस्टर डोजचे लसीकरण पूर्ण
The गडविश्व
गडचिरोली, ५ ऑक्टोबर : महाराष्ट्राच्या एका टोकावर असलेला अती दुर्गम, डोंगराळ, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हा कोविड बुस्टर डोजमध्ये राज्यातून पहिल्या क्रमांकावर आहे. सर्व जग कोविड महामारीशी लढा देत असतांना कोविड लसीकरणाच्या माध्यमातून या आजाराचा विळखा कमी करण्याकरीता प्रयत्न सुरु आहेत. अशातच गडचिरोली जिल्हा बूस्टर डोजमध्ये महाराष्ट्रात अव्वल क्रमांकावर आहे अशी माहिती गडचिरोली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, माता बालसंगोपन अधिकारी डॉ. स्वप्नील बेले यांनी ४ ऑक्टोबर ला पत्रकार परिषदेत दिली.
कोविड बूस्टर डोज लसीकरणामध्ये गडचिरोली जिल्हयाने १,३३,६६५ लाभार्थांचे लसीकरण पूर्ण केले असून, हि कामगीरी उल्लेखनीय आहे. गडचिरोली जिल्हयाचा वाटा २१.८४ टक्के आहे. तरी यापूढे सुध्दा नागरीकांचा लसीकरणामध्ये सहभाग अपेक्षित आहे. कोविड सारख्या जागतीक महामारीत मृत्यूचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने कोविड लसीकरण अत्यंत महत्वाचे असून, १२ वर्षावरील सर्व पात्र नागरीकांनी कोविडचा पहिला, दुसरा व बुस्टर डोज जवळच्या प्रा.आ. केंद्रात जावून पूर्ण करून घ्यावा असे आवाहनही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी केले आहे. १८ वर्षावरील सर्व नागरीक कोविड लसीकरणाच्या बुस्टर डोजसाठी पात्र आहेत. ज्या नागरीकांचे पहिले २ डोज कोविड लसीकरण कोविडशिल्ड किंवा कोवॅक्सीन लसीद्वारे पूर्ण झालेले आहेत असे नागरीक या पूढे दुसऱ्या डोजच्या ६ महिन्यानंतर कोविड लसीकरणाचा बुस्टर डोज घेऊन शकतात अशी माहिती डॉ. स्वप्नील बेले, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनीयावेळी दिली.