– भामरागड तालुक्यात दोन ठिकाणी बांधकामाच्या साहित्याची जाळपोळ
The गडविश्व
गडचिरोली : नक्षल्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सचिवालयाची सदस्या नर्मदाक्का हिच्या स्मृतीप्रित्यर्थ नक्षल्यांनी २५ एप्रिल रोजी दंडकारण्यात बंदचे आवाहन केले होते. या बंद दरम्यान सोमवारी नक्षल्यांनी भामरागड तालुक्यात दोन ठिकाणी हिंसक कारवाई करत साहित्यांची जाळपोळ केल्याची घटना उघडकीस आली आहे.
यात एका ठिकाणी एक ट्रॅक्टर, एक मिक्सन मशीन तर दुसऱ्या घटनेत जनरेटरसह सिमेंटच्या बॅगांची जाळपोळ करण्यात आली आहे. तसेच बंद दरम्यान नक्षल्यांनी झाडे तोडून मार्ग बंद केल्याची माहिती आहे. बंदच्या आवाहनामुळे सुरजागड पहाडीवरील लोहखनिज काढण्याचे कामही बंद ठेवण्यात आले होते.
भामरागड तालुक्यातील मरकणार भागात पुलाचे बांधकाम सुरू आहे. तसेच लष्कर भागातही पुलाचे बांधकाम सुरू असून बांधकाम स्थळावरील ट्रॅक्टर, मिक्सन मशीनची नक्षल्यांनी जाळपोळ केली. यात दोन्ही साहित्य जळून खाक झाले.
तर कोठी-मरकनार रस्त्यावर सुरु असलेल्या बांधकामावरील जनरेटरचीही जाळपोळ केली व सिमेंटच्या गोण्यांची नासधूस केल्याची माहिती आहे. भामरागड तालुक्यातील जाळपोळीच्या दोन्ही घटनांना जिल्हा पोलीस विभागाने दुजोरा दिला आहे.
दरम्यान दंडकारण्य बंदच्या पार्श्वभूमीवर एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी-आलदंडी रस्त्यावर नक्षल्यांनी एक-दोन ठिकाणी झाडे तोडून रस्ता बंद केल्याचीही बाब सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली होती . सदर बाब लक्षात येताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून झाडे हटवून वाहतूक पूर्ववत सुरू केली.
तसेच पत्रकातून नर्मदाक्काच्या कामावर प्रकाश टाकत नक्षल चळवळीतील ती आदर्श क्रांतिकारी महिला होती असा उल्लेख केला आहे.