The गडविश्व
गडचिरोली,५ ऑक्टोबर : केंद्र शासनाच्या वतीने १ ऑक्टोबर २०२२ रोजी स्वच्छ भारत अभियानाचा निकाल जाहीर करण्यात आला. यात ५० हजार ते १ लाख स्वच्छ शहर नागरिकांच्या अभिप्राय श्रेणीत गडचिरोली नगर परिषदेला “स्वच्छ शहर” पुरस्कार नुकताच पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीप सिंग पूरी, केंद्रीय नगर विकास राज्य मंत्री कौशल किशोर, केंद्रीय नगर विकास सचिव मनोज जोशी, सहसचिव रूपा मिश्रा यांच्या उपस्थितीत हस्ते नवी दिल्ली येथील तालकटोरा इनडोअर स्टेडियम मध्ये आयोजित सन्मान सोहळ्यात देण्यात आला.
गडचिरोली नगर परिषदेने “स्वच्छ सर्वेक्षण २०२२” मध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गडचिरोली नगर परिषदेला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. गडचिरोली नगर परिषदेतर्फे सदर पुरस्कार विद्यमान मुख्याधिकारी नरेंद्र बेंबरे, तत्कालीन मुख्याधिकारी विशाल वाघ, उपमुख्याधिकारी तथा प्र. आरोग्य विभाग प्रमुख रवींद्र भंडारवार व स्थापत्य अभियंता अंकुश भालेराव यांनी स्वीकारला.
केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये गडचिरोली नगर परिषदेने उत्कृष्ट कामगिरी करत ५० हजार ते १ लाख लोकसंख्या असलेल्या गटामध्ये महाराष्ट्र राज्यात ३० वे तर पश्चिम विभागातून ५१ व्या क्रमांकाने मानांकित करण्यात आले आहे. आतापर्यंतचा हा सर्वोत्तम क्रमांक असून गडचिरोली नगर परिषदेने सन २०२२ मध्ये हरीत महासिटी कंपोस्ट ब्रँड, Open Defecation Free (ODF++) व स्वच्छ सर्वेक्षणात पुरस्कार प्राप्त केला. सन २०२२ मध्ये झालेल्या या सर्वेक्षणात ४३५४ शहरांनी सहभाग घेतला होता. यात ६२ कँटोनमेंट बोर्डचाही समावेश होता. गडचिरोली नगर परिषदेने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतल्यामुळे सर्व अधिकारी, कर्मचारी व सफाई कर्मचारी यांच्या आनंदोत्सव पहावयास मिळत आहे.
(mazivasundharaabhiyan SwachhSurvekshan2023 Swachha Swachh Survekshan AzadiKaAmritMahotsav SwachhBharatMission SwachhBharatUrban MaharashtraDGIPR swachhsurvekshan2023 swachhmaharashtramissionurban)