गडचिरोली : पुन्हा व्याघ्र बळी, महिला ठार

3826

– वाघाचे हल्ले थांबता थांबेना, जेरबंद करण्यास वनविभाग अपयशी
The गडविश्व
गडचिरोली- अमिर्झा, १२ नोव्हेंबर : जिल्ह्यात वाघाचे मानवावरील हल्ले थांबता थांबेना. गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा टोली -कळमटोला मार्गावर असलेल्या शेतशिवारात वाघाने हल्ला करून महिलेस ठार केल्याची घटना आज १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. मंदा संतोष खाटे (३६) रा. अमिर्झा टोली असे मृतक महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मंदा संतोष खाटे ह्या स्वतःच्या शेतात धान कापणी करिता गेल्या होत्या. ३.३० ते ४ वाजताच्या सुमारास शेतातुन घरी परत येत होत्या मात्र इतर महिला ह्या घरी परतल्या व मंदा खाटे ह्या पुन्हा शेतावर काही कामानिमित्त गेल्या असता वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले. सायंकाळ होऊनही मंदा घरी न परतल्याने कुटुंबातील व्यक्तींनी शेताकडे जाऊन बघितले असता त्या मृतावस्थेत आढळून आल्या. यासंदर्भात माहिती गावकऱ्यांना होताच घटनास्थळी गर्दी जमलेली होती. घटनेची माहिती वनविभाग व पोलीस प्रशासनाला देण्यात आली असून बातमी लिहेस्तव घटनास्थळी दाखल व्हायचे होते.
सदर घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून खाटे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अमिर्झा परिसरात मागील काही महिन्यांपासून वाघाची दशहत आहे. मागील काही दिवसांपूर्वीच वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच पुन्हा व्याघ्र बळी झाल्याने नागरिकांनी मात्र वनविभागाप्रति रोष व्यक्त केला आहे. दोन दिवसांपूर्वीच वनविभागाच्या कार्यालयावर शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांसह वाघाला जेरबंद करण्यात यावे या करिता विशाल मोर्चा काढण्यात आला होता यावेळी लवकरच वाघाला जेरबंद करण्यात येईल असे वनविभागाच्या वतीने आश्वस्त केले होते मात्र वाघाला जेरबंद करण्यास वनविभाग हा अपयशी ठरत आहे. वाघाच्या दहशतीने शेती करायची तरी कशी ? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपस्थित होत असून वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्यात यावे अशी मागणी नागरिक वारंवार करीत आहे.©©

#tigerattack #gadchirolinews #amirza #gadchiroli #thegadvishva #forest

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here