The गडविश्व
गडचिरोली, २२ ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभपर्वावर १५ ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्य दिनानिमीत्त गडचिरोली पोलीस दलातील ०३ अधिकारी / अंमलदारांना शौर्य चक्र, ४२ अधि. / अंमलदारांना पोलीस शौर्य पदक व ०२ पोलीस अंमलदार यांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहिर करण्यात आले होते. यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील कर्तव्यावर असलेल्या पदक प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार सोहळा व स्नेहभोजनाचा कार्यक्रम १८ ऑगस्ट २०२२ रोजी सायं. ०८.०० वा. पोलीस मुख्यालय परिसरातील पांडू आलाम सभागृहामध्ये पार पडला.
सदर कार्यक्रमाकरीता पदक प्राप्त अधिकारी व अंमलदार आपले कुटूंबासह उपस्थित होते. यावेळी पदक प्राप्त जवानांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. मान्यवरांचे हस्ते पदक प्राप्त जवानांचा मोमेंटो, शाल व पुष्पगुच्छ देवून तसेच जवानांच्या पत्नीचे साडी व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी उपस्थित सत्कारमुर्तीना शुभेच्छा देतांना पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांनी आपल्या भाषणात गडचिरोली पोलीस दलात कर्तव्य करत असतांना नक्षलविरोधी कारवाईत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल महामहीम राष्ट्रपती यांचे कडून गडचिरोली पोलीस दलातील अधिकारी / अंमलदार यांना पदक जाहिर केले. भारतातील नक्षलग्रस्त जिल्ह्यांपैकी एकमेव असा जिल्हा की ज्याला सर्वाधिक पदके मिळाली. तसेच गडचिरोली पोलीस दलाला मिळालेले शौर्य चक्र हे निश्चितच महाराष्ट्र पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद कामगिरी आहे. असे मनोगत व्यक्त करून गडचिरोली पोलीस दलाने मागील २ वर्षात भरीव कामगिरी केल्याबद्दल गडचिरोली पोलीस दलातील जवानांचे कौतुक केले.
याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी अनुज तारे सा. हे आपले कुटूंबासह उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस मुख्यालयातील अधिकारी, विशेष अभियान पथक, गडचिरोली येथील सर्व अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व प्रभारी अधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.