The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “पोलीस दादालोरा खिडकी” च्या माध्यमातुन, गडचिरोली जिल्हयातील जनतेचे जीवनमान उंचावण्याचे उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणुन ६ जुलै रोजी गडचिरोली पोलीस दल व कृषी विज्ञान केंद्र सोनापूर, गडचिरोेली यांचे संयुक्त विद्यमाने ‘भव्य कृषी मेळावा’ पोलीस उपमुख्यालय प्राणहिता परिसरात पार पडला.
यावेळी उपस्थित असलेल्या अहेरी उपविभागातील अतिदुर्गम भागातील ३०० आदिवासी शेतकऱ्यांना धान व सोयाबिन बि-बियाणे तसेच आंबा, चिकू, फणस, लिंबु, शेवगा इ. फळझाड रोपांचे विनामुल्य वाटप करण्यात आले. सदर कृषी मेळाव्यात उपस्थित शेतकयांना अत्याधुनिक शेती, पीक पध्दती, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, कृषी कर्ज, पीक विमा, कृषी विभागाच्या विविध योजना, आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांबाबत तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी कृषी मेळाव्याच्या माध्यमातुन शेतीसंबंधी विविध माहिती जाणुन घेण्यास मिळाल्याबाबत अभिप्राय व्यक्त केला.
आजपर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडुन रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक ४८४, नर्सिंग असिस्टंट ११४३, हॉस्पीटॅलीटी ३०५, ऑटोमोबाईल २५४, इलेक्ट्रीशिअन १४२, प्लंम्बींग २७, वेल्डींग ३३, जनरल डयुटी असिस्टंट १०३, फील्ड ऑफीसर ११ व व्हीएलई ५२ असे एकुण २५५४ युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआयआरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्युटीपार्लर १०६ मत्स्यपालन ६० कुक्कुटपालन ४५७, बदक पालन १५१, शेळीपालन ८०, शिवणकला १३७, मधुमक्षिका पालन ३२, फोटोग्राफी ३५, भाजीपाला लागवड ५४०, पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण ७८०, टु व्हिलर दुरुस्ती ३४, फास्ट फुड ३५, पापड लोणचे ३०, टु/फोर व्हिलर प्रशिक्षण ३७०, एमएससीआयटी २०० असे एकुण २९८२ युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.
याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांनी गडचिरोली जिल्हयातील शेतकरी व इतर जनतेनी गडचिरोली पोलीस दलाच्या विविध उपक्रमाचा लाभ घेवुन आपले जीवनमान उंचवावे असे आवाहन केले तसेच नक्षलवाद्यांच्या खोटया चळवळीला बळी न पडता गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने जिल्हयाचा विकास साधावा. गडचिरोली जिल्हयातील जनतेच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असे सांगितले.
यावेळी कृषी मेळाव्यास पोलीस अधीक्षक अंकित गोयल साो., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी अनुज तारे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अमोल ठाकुर तसेच कृषी विज्ञान केंद्र गडचिरोलीचे विषय विशेषतज्ञ बुध्दावार हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अमोल ठाकुर, प्रभारी अधिकारी पोस्टे मुलचेरा सपोनि. अशोक भापकर, प्रभारी अधिकारी उपपोस्टे पेरमिली पोउपनि. धवल देशमुख, प्रभारी अधिकारी उपपोस्टे राजाराम (खां.) पोउपनि. रविंद्र भोरे, प्रभारी अधिकारी उपपोस्टे व्यंकटापूर पोउपनि. मिलिंद कुभारे, प्रभारी अधिकारी पोमके येलचिल पोउपनि. प्रविण माने तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार, पोउपनि धनंजय पाटील व नागरी कृती शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अहेरी येथील अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.