– वनविभागाच्या सुचनेकडे दुर्लक्ष केल्याने गमवावा लागला जिव
The गडविश्व
देसाईगंज, ८ सप्टेंबर : वनविभागांतर्गत येत असलेल्या उसेगाव जंगल परिसरात वाघाने इसमावर हल्ला करून ठार केल्याची घटना आज गुरूवार ८ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. प्रेमलाल तुकाराम प्रधान (४५) रा. उसेगाव असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक प्रेमलाल तुकाराम प्रधान हा जंगल परिसरात झाडणी व काडया आणण्याकरीता गेला असता वाघाने त्याच्यावर हल्ला करून ठार केले. घटनेची माहिती गावकऱ्यांना होताच घटनास्थळी पोहचून वनविभागाला माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाची चमु घटनस्थळी दाखल होवून पंचनामा करून मृतदेह शवविच्देदनाकरिता पाठविण्यात आले.
सदर घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले असून वनविभागच्या सुचनेकडे दुर्लक्ष केल्याने अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे दिसून येत आहे. तर जिल्हयात वाढते वाघाचे हल्ले बघता नरभक्षी वाघाला जेरबंद करण्याकरिता ताडोबा येथून शापशुटर आणले गेले आहे. नरभक्षी वाघाला जेरबंद करण्याकरिता वनविभागामार्फत उपायोजना करण्यात येत आहे. जंगल परिसरातील गावांना जंगलात न जाण्याच्या सुचना देण्यात येत आहे. मात्र नागरिक या सुचनेला न जुमानता जंगलात प्रवेश करीत आहे. वाघाला जेरबंद करण्याकरिता दाखल झालेल्या यंत्रणेलाही अडथडे निर्माण होत आहे.
