– प्रशासन वेळीच जागे न झाल्यास आंदोलन करण्याचा भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांचा इशारा
The गडविश्व
गडचिरोली,२५ जुलै : जिल्ह्यात गेल्या १५ ते २० दिवसापांसुन संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गडचिरोली शहरातील नाल्या तुडुंब भरल्या आहेत. शहरातील नागरिकांच्या घरांमध्ये नालीच्या पाण्याच्या शिरकाव होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असून अजुनही प्रशासकाने कोणतेही पाऊल उचललेले नाही त्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त आणि प्रशासन सुस्त अशी परिस्थिती निर्माण झालेली पाहावयास मिळत आहे. प्रशासन आता वेळीच जागे न झाल्यास भाजपा आंदोलन करणार असा इशारा भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांनी दिला आहे.
नगरपरिषदेवर भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता असतांना माजी नगराध्यक्षा सौ.योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात दरवर्षी पावसाळ्यापूर्वीच जिथे-जिथे खड्डे, चिखल व पूरपरिस्थिती निर्माण होत असते तिथे नियोजन केले जात होते. पावसाळ्यापूर्वीच शहरातील शेतकऱ्यांना शेतीवर जाण्यासाठी सोयीस्कर व्हावे याकरिता पांदण रस्त्याचे खडीकरण करण्यात आले होते. परंतु आता अति पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणच्या कच्चा रस्त्यावर खड्डे पडलेले असुन चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसाळ्यापूर्वीच शहरातील नाल्या पुर्णतः साफ करण्यात येत होत्या. आजच्या घडीला प्रशासन असतांना नाल्या जैसे थे आहेत. यामुळे,स्वामी विवेकानंद नगर, कन्नमवार वार्ड अयोध्या नगर, येथील नागरिकांना प्रशासकाच्या दुर्लक्षामुळे यावर्षी या समस्यांना समोरे जावे लागत आहे.
शहरातील अनेक तलावातील पाणी वाहून जाणाऱ्या नाल्यावर खाजगी लेआऊट धारकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पाणी अडलेला असुन, पाणी साचून नागरिकांच्या घरामध्ये जात आहे. प्रशासनाने ते अतिक्रमण हटवून साचलेल्या पाण्याचा मार्ग मोकळा करून देण्यात यावा. तसेच नॅशनल हायवे व जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे इंदिरा गांधी चोकात मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत, तसेच गांधी चौकापासून ते डॉ. कुंभारे यांच्या दवाखान्यापर्यंत फक्त एकेरी मार्गाने रहदारी सुरू आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. करिता रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करून दोन्ही मार्गाने रहदारी सुरु करावी. अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने फार मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांनी दिला आहे.