– शहरातील फुटपाथ धारकांवर पुन्हा बुलडोजर चालवला
The गडविश्व
गडचिरोली : शहरातील फुटपाथ धारकांना काही राजकीय लोकांच्या सांगण्यावरुन बळजबरीने हटविण्याची कारवाई आज रात्रीचे ९ वाजता पर्यंत सुरूच होती. ही शासकीय गुंडगिरी भाजप आणि जिल्हाधिकारी यांच्या संगनमताने पोलिसांना पुढे करून केली जात आहे. यात शहरातील शासकीय जमीन लाटणारे तसेच मोठे माॅल वालेही सहभागी झाले आहेत.
खरेतर फुटपाथ धारकांचा हा गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळत असलेला प्रश्न आम्ही संविधानीक मार्गाने सोडविण्यासाठी प्रयत्नशील होतो. कायद्यांचा सन्मान करुन आमचा पाठपुरावा सुरू असतांनाच आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमच्या शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई जयंत पाटील यांनी विधानसभेत हा ज्वलंत प्रश्न मांडला आणि या सर्व बांडगुळांच्या बुडाला आग झोंबली आणि ते बावरले. त्यामुळेच अधिकच चवताळून ही कारवाई रात्री सुध्दा सुरुच ठेवून नगरपालिका प्रशासनाने आपली ‘ कर्तव्यदक्षता’ दाखवून दिलेली आहे.
गडचिरोली शहरातील सामान्य फुटपाथ धारकांना शेतकरी कामगार पक्षाने न्याय मिळवून देणे ज्यांना खराब वाटले ते या शासकीय गुंडगिरीचा समर्थन करीत आहेत. ही कारवाई ज्या बड्या लोकांना वाचवण्यासाठी करण्याचा घाट घातला जात आहे, त्यांच्या मोठ्या बिल्डींगा पाडल्याशिवाय शेतकरी कामगार पक्ष स्वस्थ बसणार नाही. एवढेच नाही तर ज्या सत्ताधाऱ्यांनी लाखो नव्हे तर कोट्यवधी ‘गभन’ केले त्यांना ‘ईडी’ च्या दारात उभे केले नाही तर तो शेतकरी कामगार पक्ष नाही!
शहरातील गरिब, मागास,दलित लोकांना लुटणाऱ्या, पिचणाऱ्या प्रस्थापित राजकीय पक्षांचा आणि शासकीय गुंडगिरी करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो….!
गडचिरोली शहर के गरीब, मजदूर और श्रमिक एक हो…! हल्ला बोल….हल्ला बोल…..!
एक हो के हल्ला बोल…! असा नाराही शेतकरी कामगार पक्षातर्फे देण्यात आला आहे.