– जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली यांची कार्यवाही
The गडविश्व
गडचिरोली, ३ नोव्हेंबर : जिल्हयातील मूलचेरा तालुक्यात
सायंकाळी होणारा बालविवाह थांबविण्यास जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली यांना यश आले आहे.
मूलचेरा तालुक्यात एक बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार लगेच जिल्हा बाल संरक्षण टीम गडचिरोली यांनी सदर बालविवाह रोखण्याकरीता विवाहस्थळ गाव गाठले व बालक १८ वर्षाखालील असल्याची खात्री करून सर्व माहितीची शहानिशा झाल्यानंतर गावातील सरपंच पवन मंडल,नागेन सेन पोलीस पाटिल,अंगणवाडी सेविका दिपू सरकार आणि अमियो सेन यांच्या समक्ष मुलाचे घर गाठले व वधू वर यांच्या आई वडील व उपस्थित नातेवाईकांना बालविवाह केल्यास होणाऱ्या दुष्परिणामाबाबत माहिती देऊन वधुचे १८ वर्ष व वराचे २१ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय त्यांचे लग्न लावून देणार नाही असा जबाब नोंदविण्यात आला. पोलीस पाटील,सरपंच,अंगणवाडी सेविका यांच्या उपस्थितीत वर पक्ष व वधू पक्ष यांचेकडून हमी पत्र लिहून घेतले व बालिकेचे समुपदेशन करण्यात आले.
सदर कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, बाल संरक्षण अधिकारी प्रियंका आसुटकर, सामाजिक कार्यकर्ता जयंत जथाडे, संरक्षण अधिकारी मुलचेरा महेंद्र मारर्गोंनवार, तनोज ढवंगाये सामाजिक कार्यकर्ते, क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार, लेखापाल पूजा धमाले यांनी कार्यवाही केली.सदर बालविवाह थांबविण्यासाठी प्रभारी गट विकास अधिकारी मूलचेरा मनोहर रामटेके व बाल विकास प्रकल्प अधिकारी विनोद हाटकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
अशाप्रकारे जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथे व चाइल्ड लाईन टोल फ्री नंबर १०९८ या क्रमांका वर बाल विवाह बाबत संपर्क साधावे माहिती सांगणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन करण्यात आले आहे.