गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धा २०२२ : ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ स्पर्धेचे आयोजन

722

– मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांचा पुढाकार
The गडविश्व
मुंबई, २९ ऑगस्ट : दरवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणेशाचे आगमन होते आणि वातावरण चैतन्याने भरून जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात समाज प्रबोधनासाठी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा महाराष्ट्र आजही त्याच हिरिरीने जपतो आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ या विषयासंबंधी गणेशोत्सव सजावट देखावा स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबरच वैयक्तिकरीत्याही नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळे प्रबोधनपर देखावे साकारतात, तसेच घरोघरीही गणेशाची सुंदर आरास केली जाते. सार्वजनिक मंडळांच्या देखाव्यांच्या माध्यमातून आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीद्वारे सामाजिक संदेशदेखील दिले जातात. या स्पर्धेचा विषय ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ हा आहे. मताधिकार हा १८ वर्षांवरील नागिराकाचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे, हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून मंडळांना देखाव्यांच्या माध्यमातून; तर घरगुती पातळीवर गणेश मखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये यासंबंधीची जागरूकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवता येतील. तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यांसारख्या विषयांवर आपल्या देखाव्या-सजावटीतून जागृती करून लोकशाही समृद्ध करता येईल.
पाणी, सार्वजनिक स्वच्छता, खड्डेमुक्त रस्ते, चांगलं शिक्षण, चांगली घरं, अशा अनेक सार्वजनिक सुविधा नागरिकांना विनासायास प्राप्त होणं, हे सक्षम आणि सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे. मात्र नागरिकांना या सुविधांची केवळ माहिती असून उपयोग नाही, तर या सुविधा मिळवून देण्याची जबाबदारी आपल्या लोकप्रतिनिधींवर आहे आणि ती पार पाडणाऱ्या लोकप्रतिनिधीची निवड करणंही तितकंच आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला मताधिकार बजावला पाहिजे आणि तो बजावताना पैसे, वैयक्तिक वापराच्या वस्तू, तात्पुरत्या आमिषांना बळी न पडता आपल्या परिसराच्या कायमस्वरूपी विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे. अशा सुजाण नागरिकांनी बजावलेल्या मताधिकारामुळेच लोकप्रतिनिधींवर दबाव निर्माण होईल आणि खऱ्या अर्थाने लोकांनी लोकांची लोकांसाठी चालवलेली लोकशाही व्यवस्था अस्तित्वात येईल. यांसारखे संदेश देखावे व सजावटीच्या माध्यमातून देणे अपेक्षित आहे.

चला तर मग, बाप्पाचं स्वागत आणि मताधिकाराचा जागर एकाच मखरात करू या…

स्पर्धेची नियमावली :

१. सदर स्पर्धा वैयक्तिक ( घरगुती गणेशोत्सव सजावट) आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अशा दोन्हींसाठी आहे.

२. सदर स्पर्धेत घरगुती गणेशोत्सव सजावटीसाठी पुढीलप्रमाणे साहित्य पाठवावे :

२.१ मताधिकार, आधारकार्ड जोडणी, निवडणूक, लोकशाही या विषयाला अनुसरून केलेल्या घरगुती गणेशोत्सव सजावटीचे विविध कोनांतून काढलेले पाच फोटो पाठवावेत.

२.२ प्रत्येक फोटो हा जास्तीत जास्त ५ MB साइजचा व JPG फॉरमॅटमध्येच असावा.

२.३ मताधिकार, आधारकार्ड जोडणी, निवडणूक, लोकशाही याविषयीच्या देखाव्याची ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) गूगल अर्जावर जोडावी.

२.४ ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) आणि फोटो गूगल अर्जावर जोडताना, त्यावर स्पर्धकाचे नाव येणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा सदर अर्ज स्पर्धेतून बाद केला जाईल.

२.५ चित्रफितीला आवाजाची जोड (व्हाइस ओव्हर) देऊ शकता.

२.६ ध्वनिचित्रफितीची (व्हिडिओची ) साईज जास्तीत जास्त १०० MB असावी. तसेच ही ध्वनिचित्रफित mp4 फॉरमॅटमध्ये असावी आणि ती एक ते दोन मिनिटांची असावी.

३. सदर स्पर्धेत भाग घेण्यासाठी गणेशोत्सव मंडळाने पुढीलप्रमाणे साहित्य पाठवावे :

३.१ मताधिकार, आधारकार्ड जोडणी, निवडणूक, लोकशाही या विषयाला अनुसरून केलेल्या देखाव्याचे विविध कोनांतून काढलेले पाच फोटो पाठवावेत.

३.२ प्रत्येक फोटो हा जास्तीत जास्त ५ MB साइजचा व JPG फॉरमॅटमध्येच असावा.
३. ३ आपल्या गणेशोत्सव मंडळामध्ये केलेल्या मताधिकार, लोकशाही याविषयीच्या देखाव्याची ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) गूगल अर्जावर जोडावी.

३.४ ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) आणि फोटो गूगल अर्जावर जोडताना, त्यांवर मंडळाचे किंवा मंडळातील कुणा व्यक्तीचे नाव, लोगो येणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा सदर अर्ज स्पर्धेतून बाद केला जाईल.

३.५ ध्वनिचित्रफितीची (व्हिडिओची) साईज जास्तीत जास्त ५०० MB असावी. तसेच हीं ध्वनिचित्रफीत mp4 फॉरमॅटमध्ये असावी आणि १० मिनिटांपेक्षा अधिक असू नये.

३.६ गणेशोत्सव मंडळाने सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गूगल अर्जावर स्पर्धक म्हणून गणेशोत्सव मंडळाचे नाव लिहून, त्यानंतर डॅशचे चिन्ह (-) देऊन अध्यक्ष किंवा सचिव यांचे नाव लिहावे (उदा. घोलाईदेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ – मंदार मोरे) आणि पुढे त्याच व्यक्तीचा पत्ता आणि मोबाइल क्रमांक लिहावा.

३.७ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष किंवा सचिव यांची स्वाक्षरी असलेले पत्र गूगल अर्जावर जोडावे. या पत्राचा नमुना गूगल अर्जावर, जिथे हे पत्र जोडायचे आहे, तिथे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

४. स्पर्धकांनी आपले फोटो आणि ध्वनिचित्रफीत https://forms.gle/6j7ifuUA4YSRZ6AU7 या

गूगल अर्जावरील माहिती भरून त्यावर पाठवावेत.

५. ज्या स्पर्धकांना फोटो किंवा ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) पाठवण्यास अडचण येईल, त्यांनी ८६६९०५८३२५ (प्रणव सलगरकर), ९९८७९७५५५३ (तुषार पवार) या व्हॉट्सॲप क्रमांकावर संदेश (मेसेज) पाठवून कळवावे.

६. दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ ते ९ सप्टेंबर २०२२ या काळात आलेले साहित्यच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल.

७. बक्षिसांचे स्वरूप :

७. १ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल :

अ. प्रथम क्रमांक :- ५१,०००/

ब. द्वितीय क्रमांक :- २१, ०००/

क. तृतीय क्रमांक :- ११,०००/

ड. उत्तेजनार्थ :- ५००० रुपयांची एकूण दहा बक्षिसे.

७.२ घरगुती गणेशोत्सव सजावटीसाठी बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल :

अ. प्रथम क्रमांक :- ११,०००/

ब. द्वितीय क्रमांक :- ७,०००/

क. तृतीय क्रमांक :- ५,०००/

ड. उत्तेजनार्थ :- १००० रुपयांची एकूण दहा बक्षिसे.

८. मतदान, निवडणूक, लोकशाही या विषयांना अनुसरून साहित्य पाठवणाऱ्या सहभागी सर्व स्पर्धकांना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल.

९. आलेल्या देखाव्या-सजावटीमधून सर्वोत्तम देखावे – सजावटी निवडण्याचा तसेच स्पर्धेच्या नियमांमध्ये बदल करण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक यांच्याकडे राहील.

१०. स्पर्धकाने पाठवलेल्या साहित्यावर अन्य कुणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी सदर स्पर्धकाची असेल.

११. निवडणूक कार्यालयात कार्यरत कर्मचारी / अधिकारी सदर स्पर्धेत सहभागी होऊ शकतात, मात्र त्यांच्या साहित्याचा बक्षिसासाठी विचार केला जाणार नाही.

१२. स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here