कधी कधी स्वतःला वेळ देण्यासाठी, नव्याने ओळखण्यासाठी भटकंती महत्त्वाची असते. आता हिवाळ्याला सुरुवात होत आहे. हळूहळू वातावरणातील गारवा वाढत असून अनेकजण फिरण्यासाठी पर्याय शोधत आहेत. हिवाळी पर्यटनासाठी टिपागड हे उत्तम पर्याय आहे. गर्द वनराईत असलेले टिपागड हे ट्रेकिंग पॉईंट आहे. गडचिरोली राजनांदगाव या आंतरराज्य महामार्गावर सावरगावच्या उत्तरेस कोटगुलकडे जाण्याच्या रस्त्यावर न्याहाकल गावाच्या पायथ्याशी टिपागड हे स्थळ आहे. टिपागड उंच डोंगरावर असल्याने त्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. या गडावर चढण्यासाठी एक हजार फूट उंच चालत जावे लागते. विशेष म्हणजे टिपागड डोंगरावर बारमाही पाणी असणारे विस्तीर्ण तलाव आहे. एवढ्या उंचीवर वर्षभर पाणी असणारे हे एकमेव ठिकाण असून निसर्गाचे अद्भुत आश्चर्य मानले जाते. तलावालगत अनेक प्रेक्षणीय डोंगर व टेकड्या आहेत. टेकड्यावरील गर्द वनराईत सागवन, बिजा ,हिरडा ,बेहडा, बांबू असे विविध प्रकारचे वृक्ष येथे आढळतात. या वनराईत अनेकदा वन्यजीवांचेही दर्शन होते. टिपागडच्या किल्ल्यातूनच टिपागडी या नदीचा उगम झाला आहे. या पहाडीवर तलावाभोवती दुर्गादेवी व हनुमानाचे मंदिरही आहेत. दरवर्षी येथे १० ते १५ दिवसांची भव्य यात्रा भरते. महाराष्ट्र, छत्तीसगड अन्य जवळच्या भागातील भाविक या यात्रेत येतात. येथे असलेल्या डोंगराच्या आत इंग्रजांचे काही साहित्य असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. गर्द वनराईतील निरव शांतता व विविध पक्ष्यांचा आवाज येथे अनुभवता येतो.

टिपागड समबंधीत आख्यायिका –
टिपागडचा राजा पुरमशहाच्या दुदैवी मृत्यू नंतर या किल्ल्यातील खजिना आपल्याला मिळावा यासाठी अनेकांनी प्रयत्न केले त्यासाठी तत्कालीन गुरुबाबा यांच्यावर प्रचंड दबाव आणल्या गेला त्याला कंटाळून गुरुबाबांनी टिपागडच्या ऐतिहासिक तलावात जलसमाधी घेतली अशी आख्यायिका टिपागड बाबत सांगितली जाते.
कसे जायचे – गडचिरोली वरून टिपागड हे स्थळ ९८ किलोमीटर आहे.
जाण्यासाठी अनुकूल काळ – पावसाळी हंगाम वगळता पूर्ण वर्ष
– स्वाधिनता बाळेकरमकर
लेखिका
©©©
(Swadhinta Balekaramkar , Gadchiroli Nature Place , Tipagadh, Dhanora, Kotgul, Gadchiroli News)