– देसाईगंजमधील सहा ग्रापंचे पोलिस विभागास पत्र
The गडविश्व
गडचिरोली, ६ ऑगस्ट : गावातील अवैध दारूविक्रेत्यांवर किती गुन्हे दाखल आहेत, याची माहिती मागविण्यासाठी देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर, कोरेगाव, कुरुड, कोंढाळा शिवराजपुर आणि तुळशी ग्रामपंचायतने पोलीस विभागाशी पत्रव्यवहार करून यादी मागविली आहे. ही यादी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दर्शनी भागात लावून त्यांना शासकीय योजनांसह विविध कागदपत्रांपासून वंचित ठेवण्याचा निर्णय संबंधित ग्रापंने घेतला आहे.
देसाईगंज तालुक्यामधील कोरेगाव, कुरुड, कोंढाळा, शिवराजपुर, शंकरपूर आणि तुळशी या ग्रामपंचायतने दारूमुक्त गाव निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने गावातील अवैध दारूविक्रेत्यांवर किती गुन्हे दाखल आहेत, यासंदर्भातील माहिती मागविण्यासाठी पोलीस विभागाला पत्र देण्यात आले आहे. दारूविक्रेत्यांची यादी प्राप्त होताच सदर यादी ग्रामपंचायतच्या दर्शनी भागात लावून संबंधित विक्रेत्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक दाखले कागदपत्रे देण्यात येणार नाही, असाही ठराव ग्रामपंचायतींनी घेतला आहे. त्याची अंमलबजावणी म्हणून गावातील विक्रेत्याच्या नावाची यादी जाहीर करण्यात येणार आहे व त्यांना तडीपार करण्यात येणार आहे. तसेच ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या दारूविक्रेत्यांकडून ‘मी सदर गावचा रहिवासी असून यापुढे दारू विक्री करणार नाही’ असे शपथपत्र ग्रामपंचायत समितीला लिहून देतो, अशा आशयाचे शपथपत्र सुद्धा विक्रेत्यांकडून लिहून घेण्यात येणार आहेत. यासाठी तालुक्यातील इतरही ग्रामपंचायत समित्या पुढाकार घेऊन प्रयत्न करणार आहेत.