गोंडवाना विद्यापीठातर्फे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे दोन दिवसीय ‘अमृत क्रीडा व कला’ महोत्सवाचे आयोजन

442

– ३५० पेक्षा अधिक शिक्षकेत्तर कर्मचारी राहणार उपस्थित
– झाडीपट्टी रंगभूमीचे प्रसिध्द कलावंत व नकलकार हिरालाल पेंटर यांची प्रमुख उपस्थिती

The गडविश्व
गडचिरोली : शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधील कलागुणांना वाव देवून त्यांच्यामध्ये खेळाप्रती उत्साह निर्माण व्हावा याकरिता गोंडवाना विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सलंग्नित अनुदानित महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांरिता २६ व २७ फेब्रुवारी २०२२ रोजी गोंडवाना विद्यापीठ परिसरात ‘अमृत क्रीडा व कला महोत्सव २०२२’ चे आयोजन करण्यात आले आहे.
या क्रीडा व कला महोत्सवात विद्यापीठ सलग्नीत ३५० पेक्षा अधिक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित राहणार आहे तसेच अशाप्रकारचे क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन करणारे गोंडवाना विद्यापीठ हे राज्यातील प्रथम विद्यापीठ असल्याची माहिती आज आयोजीत पत्रकार परिषदेत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी दिली.
सदर क्रिडा महोत्सवाचे पहिले पुष्प शनिवार २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठ परिसरात संपन्न होणार आहे. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी संजय मिणा, प्रमुख अतिथी म्हणून अर्जुन पुरस्कार (ॲथलेटिक्स व पावर लिफ्टिंग) भारत सरकार विजय मुनीश्वर, गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, मुख्य समन्वयक महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समिती अजय देशमुख उपस्थित राहणार आहेत. तर याच महोत्सवाच्या दुसऱ्या पुष्पाचे उद्घाटन २६ फेब्रुवारी रोजीच सायंकाळी ५ वाजता होणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, विशेष अतिथी म्हणून झाडीपट्टी रंगभूमीचे प्रसिध्द कलावंत व नकलकार हिरालाल पेंटर यांची उपस्थिती राहणार आहे.
क्रिडा महोत्सवात क्रिकेट, व्हॉलीबॉल,रनिंग, फास्ट वॉकिंग, कबड्डी, कॅरम, बुध्दीबळ,संगीत खुर्ची, खो-खो अशा विविध सांघिक स्पर्धा तर कला महोत्सवात समुहगीत, एकल गित, समुह नृत्य, नाटीका मिमिक्री या स्पर्धा होणार आहेत.
या महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता पार पडणार आहे. समारोप व बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, बक्षीस वितरण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, विशेष अतिथी म्हणून क्रिकेट खेळाडू विदर्भ रणजी संघ रोहित दत्तात्रय, प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे राहतील. संचालक,क्रीडा व शारीरीक शिक्षण डॉ.अनिता लोखंडे, संचालक विद्यार्थी विकास डॉ. शैलेंद्र देव हे या महोत्सवाचे आयोजक आहेत. या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. अनिल झेड. चिताडे तसेच गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोज जाधव, उपाध्यक्ष निलेश काळे, सचिव सतिश पडोळे, पदाधिकारी, सर्व व्यवस्थापन समिती सदस्य, चंद्रपूर गडचिरोली जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत रंदई, महासचिव अरून जुनघरे, कार्याध्यक्ष लोमेश दरडे, कार्यकारी मंडळ, विद्यापीठाचे अधिसभा सदस्य अशोक गोटा, हुमेश काशीवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here