The गडविश्व
गोंदिया : विद्युत शॉक देऊन वाघाची शिकार करुन त्याचे अवयव गायब केल्याची घटना आज गुरुवारी १३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अर्जुनी मोरगाव तालुक्यातील रामघाट बीटातील कक्ष क्रमांक २५४ बी मध्ये घडली. सदर घटनेमुळे वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत रामघाट बीट कक्ष क्रमांक २५४ बी मध्ये वन कर्मचारी व वन मजूर गुरुवारी सकाळी गस्त घालण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांना बीट क्रमांक २५४ बीमध्ये एक वाघ मृतावस्थेत आढळला. याची माहिती लगेच उपवनसंरक्षक व संबंधित अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि मानद वन्यजीव संरक्षक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरील मृतावस्थेत आढळलेल्या वाघाचा जबडा व नखे गायब असल्याची माहिती आहे. तसेच या वाघाची दोन दिवसांपूर्वीच शिकार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विद्युत शाॅक लावून या वाघाची शिकार करण्यात आली असावी अंदाज घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांनी वर्तवला असून पंचनामा करण्यात आला आले. वाघाचे श्वविच्छेदन झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होवू शकेल असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
वाघाचे वय चार वर्ष असून तो नवेगावबांध-नागझिरा अभयारण्यातील नसून बाहेरुन या परिसरात आल्याची माहिती आहे.