– सुभाषग्राम ग्रापंच्या बैठकीत निर्णय
The गडविश्व
गडचिरोली, ८ ऑगस्ट : ग्रामपंचायत अंतर्गत गावातील दारूविक्रेत्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यानंतरही न जुमानता अवैध व्यवसाय सुरूच ठेवल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा निर्णय चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम ग्रामपंचायत समितीने घेतला आहे.
सुभाषग्राम ग्रापं कार्यालयात आयोजित बैठकीला सरपंच कृष्णा मंडल, तंमुस अध्यक्ष विकास मंडल, ग्रापं सदस्य पौर्णिमा बिश्वास, अनिल मंडल, विधान मंडल, माधवी बाछाड, उमा मजुदार, आरती समाद्दार, सचिन गोमस्ता, रवींद्र गलबले उपस्थित होते.
यावेळी मुक्तीपथ ग्रामपंचायत समितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांचे वाचन करण्यात आले व समितीचे पुनर्गठन करण्यात आले. समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सहसचिव यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. याप्रसंगी कलम १८८, २७२, २७३, ग्रामपंचायत अधिनियम दारू बंदी कायदा, पेसा कायदा, अल्पवयीन मुलांचा संरक्षण कायदा, साथरोग कायदा, सुगंधित तंबाखू गुटखा बंदी कायदा, अन्न व औषध मानके कायदा इत्यादी कायद्याची अंमलबजावणी करून आपले गाव दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी काय करता येईल व व्यसनापासून कसे दूर राहता येईल, याबाबत मुक्तिपथ तालुका संघटक आनंद इंगळे व उपसंघटक आनंद सिडाम यांनी समजावून सांगितले. दरम्यान, समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी दारूविक्रेत्यांना नोटीस देण्याचा निर्णय सर्वानुमते करण्यात आला. यावेळी स्पार्कचे प्रियंका भुरले व सोनी सहारे उपस्थित होत्या.