– जिल्हा सामान्य रुग्णालय व चंद्रपुर कॅन्सर केअर फौंडेशनचा पुढाकार
The गडविश्व
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात कॅन्सर पिडीत रुग्णावर उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमच किमो थेरेपी सुरू करण्यात आली. ही किमो थेरेपी सत्रे आणि सेवा चंद्रपूर कॅन्सर केअर फौंडेशनच्या सक्षम वैद्यकीय पथकाद्वारे मोफत दिली जात आहे. चंद्रपूर कॅन्सर केअर फौंडेशन हे टाटा ट्रस्ट व वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय (डिएमईआर) तसेच डिस्ट्रिक्ट मिनरल फौंडेशन(डिएमएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने अत्याधुनिक ‘डे केअर केमोथेरपी सेंटर’ ची सुरुवात झाली आहे.
कॅन्सर अर्थात कर्करोगाच्या उपचार घेत असलेल्या रुग्णांना आता दिलासा मिळणार आहे. या ठिकाणी कॅन्सरग्रस्त रुग्णांना प्रथमच किमो थेरेपी सुविधा दिली जाणार आहे. याचा सर्वाधिक लाभ चंद्रपूर, गडचिरोली व लगतच्या आंध्रप्रदेश व तेलंगणातील रुग्णांना होणार आहे.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, टाटा ट्रस्ट कॅन्सर केअरच्या शैक्षणिक विभागाचे प्रमुख डॉ. कैलास शर्मा यांच्या मार्गदर्शनात डे-केअर सेंटरचे काम सुरू आहे.
4 फेब्रुवारी 2022 रोजी जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधत जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे डे केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले होते. तर दि. 10 फेब्रुवारी रोजी पहिल्या रुग्णाला किमो थेरेपी देण्यात आली. यावेळी टाटा ट्रस्टस कॅन्सर केअरच्या वतीने ओकॉलॉजिस्ट डॉ. गोपीचंद वरटकर यांनी अंडाशयाच्या कॅन्सरग्रस्त रुग्णाला चंद्रपूर, जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथम किमो थेरेपी दिली.
या ठिकाणी अत्याधुनिक साहित्यांसह 8 बेडची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. डे-केअर सेंटरमध्ये लागणारी सर्व प्रकारची औषधी, डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी टाटा ट्रस्टतर्फे उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये बायोसेफ्टी कॅबिनेट, लॅमीनर फ्लो व मल्टिपॅराचा प्रामुख्याने समावेश आहे. किमोथेरपीचे सायकल असतात, कधी कधी केमोथेरपी झाल्यावर रुग्णांना त्रास झाल्यास पुढील उपचाराची गरज भासते. त्यामुळे 8 बेडची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. यावेळी ओकॉलॉजिस्ट डॉ. गोपीचंद वरटकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू कॅन्सरग्रस्त रुग्णांनी किमो थेरेपीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.