– जागतिक पोलाद संघटनेकडून 22 एप्रिल रोजी आकडेवारी प्रसिद्ध
– पोलाद मंत्री रामचंद्र प्रसाद सिंह यांनी देशातल्या पोलाद उद्योगाचे केले अभिनंदन
The गडविश्व
नवी दिल्ली : जागतिक पातळीवर, पोलाद उद्योगाने केलेल्या चमकदार कामगिरीसाठी, केंद्रीय पोलाद मंत्री रामचंद्र प्रसाद सिंह यांनी भारतीय पोलाद उद्योगाचे अभिनंदन केले आहे आणि हीच कामगिरी पुढे वर्षभर कायम ठेवावी, अशा शब्दांत, त्यांची पाठ थोपटली आहे. पोलाद उद्योगाने, उत्पादनांची गती कायम राखल्यास, येत्या 25 वर्षात, म्हणजेच अमृतकाळात, भारत 500 दशलक्ष टन पोलाद उत्पादन करु शकेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जागतिक पोलाद संघटनेने 22 एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, पोलाद उत्पादन करणाऱ्या जगभरातील प्रमुख दहा देशांपैकी भारत हा एकमेव देश आहे, ज्याने जानेवारी ते मार्च 2022 या काळात, पोलाद उत्पादनात वाढ नोंदवली आहे. भारताने या काळात 31.9 दशलक्ष टन पोलाद निर्मिती करत, 5.9. टक्के वृद्धी नोंदवली आहे. मार्च 2022 मध्ये, भारतात,10.9 दशलक्ष टन पोलाद निर्मितीसह भारताने, 4.4 टक्के वृद्धी दर गाठला आहे. भारताव्यतिरिक्त, दहा देशांमधील केवळ ब्राझिल या देशानेच, केवळ मार्च महिन्यात वृद्धी नोंदवली आहे.
पोलाद मंत्र्यांनी, याच आठवड्याच्या सुरुवातीला, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांसोबत बैठका घेतल्या होत्या. आणि त्यांचा भांडवली खर्च, उत्पादनाची उद्दिष्टे आणि भविष्यातील योजना याविषयी चर्चा केली. त्याशिवाय, या भारताने, 2070 या वर्षापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट ठेवले आहे, याचीही त्यांनी आठवण करुन दिली. त्याशिवाय हायड्रोजन मिशन आणि स्वच्छ तसेच हरित ऊर्जानिर्मितीसाठी, भविष्यातील योजना तयार करण्याची सूचनाही केली होती. पोलाद उद्योगाच्या प्रतिनिधींनी, पोलाद मंत्रालयाकडून मिळणाऱ्या मार्गदर्शन आणि पाठिंब्यासाठी त्यांचे आभार मानले आहेत.