जागतिक दृष्टिदान दिन सप्ताह विशेष
मानवी जीवनात मरणोत्तर डोळेच फक्त अंधाना मदत करू शकतात. तेव्हा दृष्टी दानामुळे एक माणूस दुसऱ्या अंध माणसाचे जीवन प्रकाशमय करून त्याला सामान्य जीवन जगण्यास मदत करु शकतो. नेत्रदानाची प्रक्रिया मृत्युच्या काही तासांत- शक्यतो व्यक्तीच्या मृत्यूनंतर सहा तासांच्या आत करण्यात येते. नेत्रदानाचा निर्णय घेतलेल्या एका मृतव्यक्तीचे डोळे एका नेत्रहीन व्यक्तीला देण्यात येतात. त्यामुळे त्या अंधव्यक्तीचे जीवन प्रकाशमय होते. आपल्यालाही एखाद्या व्यक्तीचे आयुष्य उजळून टाकायचे असेल, तर आपण आपल्या नजीकच्या नेत्रदान हॉस्पिटलमध्ये संपर्क करून नेत्रदानासाठी नोंदणी करू शकतो. नेत्रदान ही संकल्पना राबविण्याचा दिवस म्हणजे जागतिक दृष्टीदान दिवस होय. प्रत्येक व्यक्तीने नेत्रदानाचा संकल्प केल्यास मोठ्या प्रमाणात जगातील नेत्रहीन व्यक्तींच्या दृष्टींना प्रकाशमान करु शकू. आजच्या काळात नेत्रदान संकल्पाचा विचार आणि आचार सामान्य माणसाच्या मनावर बिंबवण्याची गरज आहे.
अलीकडे दृष्टीला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. दृष्टी या शब्दावरून अलीकडे बऱ्याच प्रमाणात टोमणे मारता येतात. सरकारला दृष्टी नाही, जाणूनबुजून धृतराष्ट्राची भूमिका घेत आहे; तसेच प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांना “भावी काळात दूरदृष्टी ठेवून भावी जीवनात कोण व्हायचे आहे, हे ठरवून वाटचाल कर!” असे सतत खुणावत असतात. एकंदरित काय? तर दृष्टी ही फार महत्त्वाची आहे. कलियुगात दानाला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. अवयवदान, रक्तदान, नेत्रदान, अवयवदान आदींना फार महत्त्व आहे. धनदान, अन्नदान यापेक्षा जर नेत्रदान करून एखाद्या अंधव्यक्तीला दृष्टी दिली, तर हा दाता आयुष्यात आपल्या कर्तबगारीने खुप मोठा होईल. त्याच्या हातून हे एक श्रेष्ठ समाजकार्य देखील घडेल. १० जून हा जगभर दृष्टिदान दिवस म्हणून साजरा केला जातो; कारण त्या दिनाचे औचित्य साधून दृष्टिदानाचे स्मरण राहील. त्यामुळे मरणोत्तर नेत्रदानाची इच्छा असणाऱ्या व्यक्ती आताच नेत्रपेढीत जाऊन विहित नमुन्याचा फॉर्म भरून दिला, की मरणोत्तर नेत्रदानाचे कार्य सत्कारणी लागेल. एखाद्या व्यक्तीच्या शरीराचे सर्व भाग महत्वाचे असतात, परंतु यामध्ये डोळ्यांना थोडे अधिक महत्त्व असते. डोळे ही देवाने दिलेली सर्वोत्कृष्ट अमूल्य देणगी आहे. ज्याचे डोळे नसतात त्यांच्याकडूनच त्याचे मूल्य चांगले समजू शकते. मृत्यूनंतर डोळे दान देऊन आपण कोणालाही नवीन जीवन देऊ शकतो. नेत्रदानाचे महत्व लक्षात घेऊनच दरवर्षी १० जून हा दिवस जगभर अंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या माध्यमातून लोकांना नेत्रदानाचे महत्त्व सांगून नेत्रदानाची जनजागृती केली जाते. जागतिक नेत्रदान दिनाचे उद्दिष्ट व नेत्रदानाचे महत्व या बद्दलची जनजागृती करून लोकांना किंवा त्यांच्या नातेवाईकाच्या मृत्यूनंतर डोळे दानास प्रवृत्त करणे आहे. अंधत्व ही विकासशील देशांमध्ये प्रमुख सार्वजनिक आरोग्याच्या समस्यांपैकी मुख्य समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटना- डब्ल्यूएचओ अनुसार कार्निया संबंधित आजार, मोतीबिंदू आणि काचबिंदू नंतर होणाऱ्या दृष्टीहानी आणि अंधत्वाच्या मुख्य कारणांपैकी आहे.
सुप्रसिद्ध नेत्रविशारद डॉ.आर. ए.भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो. मृत्यूनंतर नेत्रदान करावे, याच्या प्रसारासाठी स्वयंसेवी संस्था पुढे सरसावत आहेत. आज २१व्या शतकातील विज्ञान इतके पुढे गेले आहे, की एका व्यक्तीचे डोळे आणि पर्यायाने त्याची दृष्टी घेऊन ते दुसऱ्याला म्हणजे ज्या व्यक्तीला दृष्टी नाही, अशा व्यक्तीला सहज देता येतात. त्यामुळे त्या अंध व्यक्तीचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते. दान देणाऱ्या अशा व्यक्ती एकप्रकारे समाजसेवा करीत असल्याचे श्रेय त्यांना मिळते. अशा सामाजिक स्वरूपाच्या केलेल्या दानामुळे त्या व्यक्तीच्या मनाला शांती, सुख, समाधान व पुण्यही प्राप्त होते. डोळे ही ईश्वराने मानवाला दिलेली फार मोठी लखलाभ देणगी आहे; परंतु काही व्यक्ती यापासून वंचित असतात. काही कारणास्तव त्यांना अंधत्व प्राप्त होते. जन्मानंतर त्यांना अंधत्व येते. त्यामुळे अशा व्यक्ती जगाचे सौंदर्य पाहू शकत नाहीत. सौंदर्याने भरलेली सृष्टी ज्यांना पाहता येत नाही, ते या सृष्टीसौंदर्याला मुकतात. या व्यक्तींना नेत्र मिळाले, तर ते सृष्टीचा आस्वाद घेऊ शकतील. माणुसकी या नात्याने दृष्टी असणाऱ्या व्यक्तीने दृष्टिहीन व्यक्तीला नेत्रदान केले, तर दात्याच्या जीवनाचे नक्कीच सार्थक होईल. मानवी जीवनात दृष्टीला प्रचंड महत्व आहे, कारण डोळे असले तर कोणतेही काम मनुष्य सहज करु शकतो. त्यामुळे दृष्टी आड सृष्टी किंवा असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी या म्हणी प्रचलित झाल्या आहेत. माणूस जगातील सृष्टिसौंदर्य आपल्या चक्षुंद्वारे अंतःकरणात साठवून ठेवू शकतो. त्यामुळे मानवाच्या पंच इंद्रियांमध्ये डोळ्यांना मानाचे स्थान आहे. डोळ्यांचा उपयोग नयनरम्य, मनोहर सृष्टीसौंदर्य आस्वाद घेण्याबरोबर त्यांची छबी सुंदर चित्राद्वारे इतरांनाही देता येते. दृष्टीहिन मानवाला नयनसुख मिळून जगाच्या सौंदर्याचा आस्वाद घेता यावा, यासाठी नेत्रदान, डोळेदान किंवा दृष्टिदान करण्याचा निर्णय प्रत्येक मानवाने केल्यास त्याचा फायदा जगातील नेत्रहीन मानवास निश्चितच होवू शकेल. अर्थात व्यक्तीने मरणोत्तर नेत्रदान केल्यास मानवी जीवनात त्याचा उपयोग अंध व्यक्तीस निश्चितच होईल.
डोळ्यांमुळे माणसांच्या चेहऱ्यावरील हावभाव, स्वभाव प्रत्येक व्यक्ती सहज ओळखू शकतो. त्यामुळेच विविध भाषांमध्ये डोळ्यांच्या विशेषणांची गाणी तयार झाली आहेत. उदा. डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे, डोळे हे जुलमी गडे रोखूनी मज पाहू नको आदी. डोळे माणसाला सौंदर्याबरोबरच अनेक गोष्टी शिकवतात. ते इतर अवयवांपेक्षा अधिकची माहिती माणसाला देतात, जसे की चेहरेपट्टी वरून ओळखला जाणारा व्यक्तीचा स्वभाव, कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी त्यातून घेतला जाणारा बोध, त्यामुळे दृष्टिदानाचे महत्व चटकन माणसाला जाणवते. दृष्टीहीन या सर्व गोष्टींना मुकतो, त्याच्या जीवनातील अंधार दूर होण्यासाठी किमान प्रत्येक व्यक्तीने मरणोत्तर नेत्र दान करण्याचा संकल्प केला पाहिजे. भारत सरकारने यासाठी विविध योजना हाती घेतल्या आहेत. दृष्टिविकार प्रतिबंधक आणि अंधत्व नियंत्रण कार्यक्रम हा शंभर टक्के केंद्र सरकार पुरस्कृत असून अनेक नेत्रपेढ्या, फिरती नेत्रपथके कार्यरत आहेत. राज्यात सुमारे नऊ लाखांपेक्षा जास्त अंध व्यक्ती असून या नेत्रदान जागृतीमार्फत लाखो व्यक्तींना दृष्टी प्राप्त होऊ शकते. सन १९७९नंतर अंधत्व निवारणासाठी नेत्रशिबीर कार्यक्रम घेण्यात आले आहेत. महाराष्ट्रात जवळजवळ १३ नेत्रचिकित्सक पथके स्थापन करण्यात आली आहेत. नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान मानण्यात आले आहे; शिवाय नेत्रदान हे मृत्यूनंतर करायचे असल्याने कसलीच भीती नाही. नेत्रदानासाठी व्यक्तीच्या मृत्यूनंतर दोन तासांच्या आत डोळे काढले गेले पाहिजेत. नेत्रदान करणाऱ्या त्याच्या नातलगांकडून पूर्ण प्रक्रिया करून घेण्याची जबाबदारी सोपवावी; म्हणून जिवंतपणी त्या व्यक्तीने संबंधित नातेवाइकांना ही जबाबदारी सोपवून तशी नोंद विहित फॉर्मवर नोंद करावी. टाइम्स आय रिसर्च फाउंडेशनच्या एका पाहणीनुसार ५.५ लाख नेत्रदात्यांपैकी १५ ते ४० वयोगटातील, तर केवळ ४ टक्के व्यक्ती ही ६० वर्षांवरील वयोगटातील आहेत, तर हे प्रमाण वाढणे ही काळाची गरज आहे.
!! गडविश्व न्युज नेटवर्क परिवारातर्फे विश्व नेत्रदान दिनानिमित्त सर्वांना संपूर्ण सप्ताहभर हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!
अलककार- श्री. कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी
(सामाजिक कार्यकर्ते, लेखक व कवी)
रामनगर- गडचिरोली, ता. जि. गडचिरोली.
फक्त व्हॉट्सअॅप. नंबर. ९४२३७१४८८३.