– कृषि विज्ञान केंद्राचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली (Gadchiroli), १२ सप्टेंबर : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जनावरांवर येणारे लम्पी स्कीन डिसीज (Lumpy skin disease ) चे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी पशुपालकांनी मुळीच घाबरून न जाता लम्पी स्कीन रोगाचे सकारात्मक निदान करण्याकरीता नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये संपर्क साधून आजारी जनावरांवर औषधोपचार करून घ्यावा असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली (sonapur-gadchiroli) व्दारे करण्यात येत आहे.

लम्पी स्कीन रोग हा त्वचा रोग असून हा प्रामुख्याने गोवंशीय जनावरांना अर्थात गाई, बैल, वासरे यांना होणारा विषाणूजन्य साथीचा आजार आहे. हा आजार माणसांवर होत नाही. हा विषाणू मेंढ्यामध्ये होणाऱ्या देवीच्या विषाणूशी साधर्म्य असणारा असून सर्वसाधारणपणे देशी गोवंशापेक्षा संकरीत जनावरे या विषाणूला लवकर बळी पडतात. हा आजार साधारणपणे दोन-तीन आठवड्यात बरा होणारा आजार असून लम्पी स्कीन आजारापासून जनावरांचे बचाव होण्यासाठी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली व्दारे करण्यात येत आहे.
लम्पी त्वचा रोग म्हणजे काय?
लम्पी त्वचा रोग हा विषाणू पासून होणारा संसर्गजन्य रोग आहे. पॉक्सीविरिडे (Poxiviridae) जातीमधील कॅप्रीपॉक्स (Capripox) विषाणूमुळे हा रोग होतो.
रोगाचा प्रसार :
या रोगाचा प्रसार डास, गोमाशी आणि गोचीड यांच्याव्दारे होतो तसेच बाधित जनावरांच्या संपर्कात निरोगी जनावर आल्यामुळे देखील होतो.
लक्षणे :
या रोगामध्ये दोन ते तीन दिवसांसाठी मध्यम तीव्रतेचा ताप आणि त्यानंतर शरीरावर सर्वत्र कडक, घट्ट कर फोड येतात. या फोडीच्या कडा घट्ट आणि वर आलेले दिसतात. ज्यामध्ये वरची त्वचा, आतील कातडे आणि स्थायूंचा भाग देखील चिकटलेला आढळतो. काही कालावधी नंतर हे फोड काळे पडतात व त्यावर खपली तयार होते. ही खपली निघून गेली तर एक रूपयाच्या नाण्याप्रमाणे गोल खड्डा होतो आणि आतली गुलाबी किंवा लाल रंगाची त्वचा दिसू लागते. याशिवाय जनावरांचे वजन कमी होणे, अशक्तपणा येणे, चारा न खाणे, लसिका ग्रंथी मध्ये सूज येणे, पायाला सुज येणे, पोळा ला सूज येणे, दूध उत्पादनात कमी होणे, गाभडणे, जनावरांमध्ये व्यंधत्व येणे आणि थोड्या प्रमाणात मरतुक होणे अशी लक्षणे आढळून येतात. म्हणजे जनावरात दहा ते वीस टक्के लागण होण्याचे प्रमाण आहे आणि साधारणपणे एक ते पाच टक्के मृत्यूचे प्रमाण आहे.
आजाराचा परिणाम / दिर्घकालीन प्रभाव :
या रोगामुळे मृत्यूचे कमी प्रमाण आहे आणि आजारी जनावरे दोन ते तीन आठवड्यामध्ये पुर्णपणे बरे होतात परंतु काही वेळा दुभत्या जनावरांचे दुधाचे प्रमाण पुढील काही आठवड्यांसाठी कमी होऊ शकते आणि काही जनावरांमध्ये व्यंधत्व आढळून येऊ शकतो.
नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाय :
१ ) आजारी जनावरांना तातडीने वेगळे करावे.
२) अशी लक्षणे दिसणाऱ्या जनावरांना इतर निरोगी जनावरांमध्ये मिसळू देऊ नये.
३) आजारी जनावरे सार्वजनिक कुरणामध्ये चरण्यासाठी घेऊन जाऊ नये किंवा जे निरोगी जनावरे आहेत त्यांना आजारी जनावरांच्या जवळ खाद्य पाणी करू नये.
४) बाह्य परजीवांचा योग्य बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. यामध्ये गोठ्यामध्ये व निरोगी जनावरांवरती जनावरांची किटकनाशके फवारणी करणे, मच्छरदाणी लावणे आणि माश्या दूर ठेवणारी औषधे यांचा वापर करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.
५) अशी लक्षणे आढळलेल्या गावांमधून इतर जनावरांची वाहतूक, बाजार आणि इतर दळवळण बंद करावे.
६) या आजारामुळे दगावलेल्या जनावरांना खोल खड्डा करून पूरून घ्यावे यामुळे त्याची लागण इतर निरोगी जनावरांमध्ये टाळता येते.
७) आजारी जनावरांचा वापर संकर करण्यासाठी टाळावा आणि आजारी जनावरांपासून मिळणारे निरस दूध न वापरता ते पूर्णपणे उकळी करून नंतर वापरावे.
उपचार :
१) पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार योग्य प्रमाणात मात्रे नुसार प्रतिजैविके द्यावीत.
२) ताप आणि सूज कमी करण्यासाठी औषधे द्यावीत.
३) ज्या ठिकाणी गाठी फुटून जखमा होतात त्या प्रत्येक ठिकाणी संसर्ग रोधक मलम लावावे आणि माशा बसू नये यासाठी फवारणी करता येणारे औषध वापरावीत.
४) खाद्यामध्ये मऊ, पातळ आणि रसदार असा चारा द्यावा. यासोबत खनिज मिश्रण द्यावे.
५) याच्या व्यतिरिक्त इतर लक्षणासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार उपचार करावेत.
(वरील सर्व उपचार हे पशुवैद्यकाकडून तपासणी करून घेऊन त्यानंतरच करून घ्यावे.)
जनावरांच्या आरोग्याची काळजी घ्या |
नियमित तपासणी पशुवैद्यकाकडून करून घ्या |