– लष्कर ए तोयबाचा एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश
The गडविश्व
जम्मू-कश्मीर : येथील शोपियान भागात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवानांना वीरमरण आले आहे तर एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षादलाला यश आले आहे. संतोष यादव आणि रोमित तानाजी अशी दोन शहिद झालेल्या जवानांची नावे आहेत.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार 18 आणि 19 फेब्रुवारीला मध्यरात्री सुरक्षादल आणि पोलिसांनी चेरमार्ग, शोपियान येथे एक संयुक्त अभियान सुरू केले होते. त्यानंतर त्यांनी त्या भागाला घेराव घालत सर्च ऑपरेशन सुरु केले आणि नागरिकांना बाहेर काढण्यात आले.सर्च ऑपरेशन दरम्यान जेव्हा सुरक्षा दल गौहर अहमद भट यांच्या घरी पोहचले. तेव्हा घर मालकाने तपास यंत्रणेला खोटी माहिती दिली व घरात दहशतवादी असल्याची माहिती लपवली. जेव्हा सुरक्षादल चौकशी करत होते, त्यावेळी घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. या गोळीबारात दोन जवान गंभीर जखमी झाले. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारा लष्कर ए तोयबाचा एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. कारावाईनंतर एक एके रायफल आणि एक बंदुकीसह दारूगोळा जप्त करण्यात आला. मात्र चकमकीत जखमी झालेल्या दोन जवानांना वीरमरण आले. पोलिसांनी घर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.