The गडविश्व
गडचिरोली : जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी जिल्हयातील सर्व विभाग प्रमुखांची मान्सून पूर्व आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी जिल्हयात आपत्ती व्यवस्थापनबाबत करण्यात येणाऱ्या विविध तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्हयात कुठेही कोणीही पावसामुळे अथवा नदीच्या पाण्यामूळे दगावू देवू नका आणि जिल्हयात शुन्य मनुष्य जीवीतहानी राहण्यासाठी सर्वांनी कार्य करावे अशा सूचना दिल्या. जिल्हयात दरवर्षी पाण्यामूळे संपर्क तुटणाऱ्या गावांमधे काय काय कामे झाली व कोणती कामे होणे बाकी आहे याबाबत तहसिलदार यांचेशी ऑनलाईन संवाद साधला. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, सहायक जिल्हाधिकारी अंकित, सहायक जिल्हाधिकारी शुभम गुप्ता, अतिरीक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, अति.पोलीस अधीक्षक समीर शेख, निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, जिल्हा मुख्यालयातील सर्व विभाग प्रमुख व तालुकास्तरावरून ऑनलाईन स्वरूपात उर्वरीत विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बैठकीत दुर्गम भागातील संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये नवसंजवीनी योजनेअंतर्गत राशन पुरवठा झाला का याबाबत माहिती देण्यात आली. ज्या गावांना अद्यापही 4 महिन्यांचा राशन पुरवठा झाला नाही त्यांना येत्या तीन ते चार दिवसात पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच गरोदर माता आणि पुरामूळे बाधित झालेल्या लोकांना राहण्यासाठी भामरागड, एटापल्ली आणि अहेरी येथे शेल्टर होम तयार करण्याच्या सूचनाही तहसिलदारांना दिल्या. गरोदर मातांना आवश्यकतेनूसार आरोग्य विभागाच्या माहेर घरात, सुरक्षित स्थळी असलेल्या आपल्या पाहूण्यांकडे तसेच प्रशासनाच्या शेल्टर होममध्ये भरती करण्यात येणार आहे. मलेरीया निर्मूलनासाठी बाधित गावागावात मच्छरदानी वाटप व फवारणी करणेत येत आहे.
पावसाळयाच्या कालावधीत पोलीस अधीक्षक कार्यालय, पाटबंधारे कार्यालय, तहसिल कार्यालय, उप विभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय इत्यादी ठिकाणी पूर्ण 24 तास आपतकालीन कक्ष उभारण्यात येणार आहेत.जिल्हास्तर व तालुकास्तरावर आपत्ती दरम्यान शोध व बचावकार्य करण्यासाठी पथके नेमण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाला पूरबाधित क्षेत्रात आवश्यक औषधं देण्यासाठी सुचना करण्यात आल्या. दरवर्षी पावसामूळे संपर्क तुटणाऱ्या 212 गावांमधील कामांबाबत तहसिलदारांकडून आढावाही यावेळी घेण्यात आला.
जिल्हयातपुरप्रवण गावे 47 असून, नवसंजीवनी योजनेत 303 गावांचा समावेश आहे. पुरबधित/खंडित गावे 212 आहेत. 2 महिन्याहुन अधिक खंडित होणारी 112 गावे आहेत.