– मुक्तिपथचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली , ७ सप्टेंबर : मुक्तिपथ अभियाना द्वारा यावर्षीच्या गणेशोत्सवाचे औचित्य साधत दारू व तंबाखू विरोधी जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. १२ ही तालुक्यातील शहर व विविध गावांतील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन ब्यानरच्या माध्यमातून व्यसनविरोधी जागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी जिल्हाभरातून ३८५ सार्वजनिक गणेश मंडळाला भेट देत, मंडपात दर्शनी भागात, संपूर्ण १० दिवसासाठी दारू व तंबाखू विरोधी संदेशाचे ब्यानर देवून ते लावण्यात आले आहे. गणेशाचे दर्शन घेण्यास येणाऱ्या सर्व बाल गोपाल, प्रौढ, गणेश मंडळ सदस्य यांच्यात जाणिवजागृती व्हावी, खर्रा व दारू सेवनाचे प्रमाण कमी व्हावे तसेच भक्तीमय वातावरणात व्यसनाचे गालबोट लागू नये हा यामागचा हेतू आहे. उत्सव काळात गणेश मंडळ सदस्य व गावकरी यांच्या सोबत बोलून गावात सामाजिक दायित्व जोपासण्या हेतू व्यसन उपचार शिबीर गावाची दारूविक्री बंदी, संघटनेची बैठक इत्यादी विषयावर सुद्धा बैठक घेऊन चर्चा करण्यात येत आहे.
‘घरातल्या बालगणेशाला खऱ्यापासून वाचवा’, ‘माझ्या दारात दारू नको खर्रा नको’, ‘ज्या तोंडाने गणपतीचे नाव घ्यावे त्याच तोंडात दारू व तंबाखू टाकलं का? अशा आशयाचे बॅनर गणेश मंडळाच्या मंडपात लावण्यात आले. ब्यानर मध्ये व्यसनविरोधी संदेशासोबत, आकर्षक असे श्रीगणेशाचे चित्र आहे. हे बॅनर श्री चे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच महिला, पुरुषांनी स्वतः व्यसनमुक्त राहून आपल्या मुलाला खर्रा, तंबाखूच्या व्यसनापासून आपण दूर ठेवले पाहिजे हा संदेश याद्वारे भाविकांपर्यंत पोहचत आहे. व्यसनाचे पाश तोडून चांगले जीवन केले पाहिजे असे आवाहन याद्वारे केले जात आहे. या जाणिवजागृती उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्याचे सहकार्य लाभत आहे व मंडळातील बाल गोपाल व इतर सर्व सदस्य सहभागी झाले आहेत, सर्वत्र उत्साह बघायला मिळत आहे.