– गडचिरोली प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय शुक्ल यांचा न्यायनिर्वाळा
The गडविश्व
गडचिरोली, ८जुलै : जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना १ वर्ष सश्रम कारावास व ३० हजार रुपये दंडाची शिक्षा शुक्रवार ८ जुलै रोजी गडचिरोली प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय शुक्ल यांनी ठोठावली आहे. शैलेश सोमपूरी पुरी (२७), मीराबाई सोमपुरी पुरी (६२) रा. कोरेगाव ता. देसाईगंज असे आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, ११ नोव्हेंबर २०१५ रोजी फिर्यादी व जखमी हे आपल्या मुलांबाळांसह दिवलीसणानिमित्त घरी पूजा करीत असतांना आरोपी शैलेश पुरी व त्याची आई मीराबाई पुरी यास लाईटबिलाचे बाकी असलेल्या पैशांबाबत विचारणा केली असता पैसे देण्यास नकार देऊन शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी ही लघुशंकेकरिता घराच्या बाहेर गेली असता आरोपींनी आरोपींनी ओढून मारहाण केली व फिर्यादीच्या पतीस कुऱ्हाड व फरच्याने डोक्यावर, कानाजवळ व शरीरावर इतरत्र ठार मारण्याच्या उद्देशाने वार करून गंभीर जखमी केले. याबाबत पोलीस स्टेशन देसाईगंज येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी तपास करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. फिर्यादी व वैद्यकीय पुरावा, इतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून आज शुक्रवार ८ जुलै रोजी आरोपींना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उदय शुक्ल यांनीकलम ३२४ भादवी मध्ये १ वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी ५ हजार रुपये प्रमाणे दंड, कलम ४५२ भादवी मध्ये १ वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
या प्रकरणात, सरकार पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील एस.यु.कुंभारे यांनी कामकाज पाहिले. गुन्ह्याचा तपास पोउपनि सतीश सोनेकर व पोउपनि सोहेल पठाण पोलीस स्टेशन देसाईगंज यांनी केला. साक्षदारांशी समन्वय साधून प्रकरणाची निर्गती करिता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.