The गडविश्व
गडचिरोली : सेंद्रीय शेतीला चालना देण्याच्या दृष्टीने तसेच रासायनिक खताचा वापर कमी करून जैविक खताचे महत्व शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्था, नागपूर आयोजीत राष्ट्रीय कार्यशाळा २६.जून २०२२ दरम्यान नितीनजी गडकरी, रस्ते, वाहतुक व महामार्ग मंत्री भारत सरकार यांच्या शुभहस्ते जैविक किडनाशके प्रयोगशाळेची उपकरणे कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली यांना प्रदान करण्यात आले त्यावेळी त्यांनी केले.
सदर जैविक किडनाशके प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी डॉ. आर. एम. गाडे, संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांचे मार्गदर्शन आणि केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्था, नागपूर यांचे अर्थसहाय्य व यंत्र सामुग्री त्याचप्रमाणे कृषि महाविद्यालय, गडचिरोली यांचे सहकार्यातून सदर जैविक किडनाशके प्रयोगशाळा आदिवासी उपयोजने अंतर्गत स्थापन करण्यात येत आहे.
याप्रसंगी मा. डॉ. त्रिलोचन मोहपात्रा, महासंचालक, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, डॉ. सुरेश कुमार चौधरी, उपमहासंचालक, नैसर्गीक संसाधन व्यवस्थापन, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, डॉ. सी. डी. मायी, माजी अध्यक्ष कृषि वैज्ञानिक भरती निवड मंडळ, नवी दिल्ली तथा कार्यकारी परिषद सदस्य, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला, डॉ. दिलीप घोष, संचालक, केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्था, नागपूर, डॉ. आर. एम. गाडे, संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला, डॉ. व्ही.के. खर्चे, संशोधन संचालक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला, डॉ. आशुतोष मुरकुटे, प्रमुख शास्त्रज्ञ, केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्था, नागपूर, संदिप एस. कऱ्हाळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली, पुष्पक ए. बोथीकर, विषय विशेषज्ञ (पिक संरक्षण), कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली उपस्थित होते.
सदर जैविक किडनाशके प्रयोगशाळेमध्ये ट्रायकोडर्मा, रायझोबियम या सारखे जैविक बुरशीनाशके किडनाशके तयार करण्यात येणार आहेत. याव्दारे रासायनिक खतांचा वापर कमी होऊन उत्पादन वाढीकरीता पोषक ठरणार आहे. शेतकऱ्यांचा रासायनिक खतांवर होणारा अति खर्चात बचत होऊन जमीनीची पोत सुधारण्यास व रोगाचे व्यवस्थापन होण्यास मदत होईल. व शेतकऱ्यांना वेळेत व कमी खर्चात बुरशीनाशके उपलब्ध होतील व त्यातून जमिनीचे व मानवी आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.
सदर जैविक बुरशीनाशके शेतकऱ्यांना खरेदी करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली येथे उपलब्ध असुन त्यासाठी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा.
ट्रायकोडर्मा :
ट्रायकोडर्मा ही बुरशी हानिकारक बुरशीच्या धाग्यामध्ये विळखा घालून साम्राज्य सरविते व त्यातील पोषक द्रव्ये शोषून फरत करते. परिणामी उपायकारक बुरशीचा बंदोबस्त होतो. या बुरशीची वाढ जलद गतीने होते. त्यामुळे अन्नद्रव्य शोषणासाठी ही बुरशी स्पर्धा करते. अपायकारक बुरशीच्या वाढीसाठी लागणारे कर्ब, नत्र, व्हिरीडीन इ. कमतरता होऊन हानिकारक बुरशीची वाढ खुंटते तसेच ट्रायकोडर्मा बुरशी ग्लोयोटॉक्सीन व व्हिरीडीन नावाची प्रती जैविक तयार करतात. ही प्रतीजैविक रोगजन्य बुरशीच्या वाढीला मारक ठरतात. तसेच या बुरशीचे कवकतंतू रोपाच्या मुळांवर पातळ थरात वाढतात व त्यामुळे रोगकारक बुरशीचे कवकतंतू मुळामध्ये प्रवेश करू शकत नाही त्यामुळे उत्पादनात वाढ घडवून आणण्यास मदत होते.
ट्रायकोडर्मा बुरशीनाशक वापरण्याचे फायदे :
१) नैसर्गीक घट असल्यामुळे या बुरशीच्या पर्यावरणावर कोणताच विपरीत परीणाम होत नाही.
२) बिज प्रक्रिया केल्याने उगवण शक्ती वाढवून बीज अंकूरण जास्त प्रमाणात होते.
३) रोगकारक बुरशीचा संहार करते.
४) फळ बागेत मर रोग व सुत्रकृमी नियंत्रणासाठी ट्रायकोडर्माचा वापर प्रभावी ठरतो.
५) माती प्रक्रियेव्दारे देखील ट्रायकोडर्मा वापर सर्व मर, मुळकुज, खोडकुज इत्यादी समस्यांवर फायदेशीर ठरते. ६) जमिनीत असणाऱ्या हानिकारक, रोगकारक बुरशीचा बंदोबस्त करण्यासाठी ट्रायकोडर्माचा वापर करणे फायद्याचे ठरते.
रायझोबियम / पी. एस. बी. :
रायझोबियम हे जिवाणू शेंगवर्गीय / व्दिदल पिकांसाठी उपयोगी पडते. सहजिवी पध्दतीने हवेतील नायट्रोजन स्थीर करणारे जिवाणू आहेत. हे जिवाणू व्दिदल पिकांच्या मुळावर गाठी निर्माण करतात. या गाठीमध्ये हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात स्थिर केले जाते. सर्वसाधारणपणे रायझोबियम जिवाणू प्रती हेक्टरी ५० ते ३०० किलो नत्र स्थिर करतात. रायझोबियम हे जैविक खत भुईमुंग, उडीद, मुंग, तूर, वटाणा, हरभरा, मोहरी, सोयाबीन, घेवडा इत्यादी शेंगवर्गीय पिकांसाठी वापरले जाते. वेगवेगळ्या गटातील विशिष्ट पिकांना त्याच गटाचे रायझोबियम जीवाणू खत वापरावे.
सदर प्रयोगशाळाव्दारे जैविक खताचे उत्तम ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले जाणार आहे. यामुळे शेतजमीनीत सुधारणा होऊन उत्पादन वाढीकरीता महत्वाचे ठरणार आहे. त्याचप्रमाणे नागरीकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. तसेच शेतकऱ्यांना वाजवी दरामध्ये जैविक खते उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.