The गडविश्व
सातारा , ०१ नोव्हेंबर : आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल पत्रकारिता ही संकल्पना झपाट्याने विस्तारत आहेत. माध्यमाची पोहोच आणि गतिमानता ही बलस्थाने लक्षात घेऊन डिजिटल पत्रकारितेचे सामर्थ्य विधायक परिवर्तनासाठी वापरणे गरजेचे आहे. लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसाठी माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. आज झालेल्या अधिवेशनात ज्या मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत. त्याचा सकारात्मक विचार करुन सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी केले. ते सातारा जिल्ह्यातील भिलार या पुस्तकांच्या गावात आयोजित डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र पहिले राज्यस्तरीय अधिवेशन २०२२ च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीनिवास पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समिर शेख, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने, संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विकास भोसले आदी उपस्थित होते.
खासदार पाटील म्हणाले, पत्रकारितेला मोठा इतिहास आहे. आजची पत्रकारिता बदलली असून त्याला आधुनिकतेची जोड मिळत आहे. पत्रकारांनी सत्याला वाचा फोडून सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका बजावावी.
संघटनेचे अध्यक्ष शमाने यांनी आपल्या प्रास्ताविकात संघटनेची भूमिका विषद करुन डिजिटल माध्यमांचे महत्व सांगितले. तसेच त्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी आणि समस्या या विषयी माहिती दिली. तसेच डिजिटल मीडियाच्या प्रतिनिधी कोण चुकत असेल तर त्या चुकाही वेळीच निर्देशनास आणून द्याव्यात, असेही ते म्हणाले.
यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची स्मरणिका, पुस्तक व विविध दिवाळी अंकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.