– ग्रामपंचायत समिती व मुक्तिपथची संयुक्त कृती
The गडविश्व
गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील तुळशी येथील दारूविक्रेत्यांच्या घराची तपासणी करून ८५ टिल्लू देशी दारू जप्त करीत गावकऱ्यांच्या उपस्थितीत नष्ट केल्याची कृती तुळशी ग्रामपंचायत समिती व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या केली. तसेच पुन्हा दारूविक्री करतांना आढळून आल्यास ग्रामसभेच्या माध्यमातून संबंधित विक्रेत्याला तडीपार करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
तुळशी ग्रामपंचायत समिती नुकतीच पुनर्गठित करण्यात आली. तसेच गावातील अवैध दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेऊन दारूविक्रेत्यांना ताकीद देण्यात आली होती. गावातील अवैध दारूविक्री बंद झाली होती. दरम्यान, गुरु पौर्णिमेच्या सणानिमित्त गावात दारूविक्री सुरु असल्याची माहिती मिळताच ग्रामपंचायत समितीचे पदाधिकारी व मुक्तिपथ तालुका चमूने गावातील दारूविक्रेत्यांच्या घरी भेट देऊन पाहणी केली असता, तीन दारूविक्रेत्यांच्या घरातून अवैध दारू जप्त करण्यात आली. जवळपास ८५ टिल्लू देशी दारू पकडून गावकऱ्यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आली. तसेच गावातील अवैध दारूविक्री सुरु करण्याचा प्रयत्न करीत अवैध व्यवसाय करणाऱ्यांचा पुन्हा माल नष्ट करण्यात आल्यामुळे विक्रेत्यांना वचक बसली आहे. सोबतच यानंतर जो दारूविक्री करतांना आढळून येईल, त्याला ग्राम समितीच्या निर्णयान्वये १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत तडीपार करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला आहे. तसेच संबंधित दारूविक्रेत्याना नोटीस देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत समितीचे अध्यक्ष सुरेश तोंडफोडे , माजी पोलीस पाटील कान्हाजी दुनेदार, पोलीस पाटील तेजस्विनी दूनेदार, ग्रामपंचायत सदस्य सुनीता वाघाडे, अस्मिता मिसाळ, सुरेखा दुणेदार यांच्यासह गावकरी उपस्थित होते.