तृतीय पंथी ओळख दिनानिमीत्त मतदार नोंदणीची विशेष शिबिरे

414

The गडविश्व
गडचिरोली : 31 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय तृतीय पंथी ओळख दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात 27 ते 2 एप्रील या कालावधीत तालुका स्तरावर ही नोंदणी शिबिरे राबवली जाणार आहेत.
तृतीय पंथीयाकडे मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची असलेली कमतरता लक्षात घेउन भारत निवडणूक आयोगाने त्यांना कागदपत्रांबाबत सवलत देऊ केली आहे. 18 ते 21 वयोगटातील ज्या तृतीय पंथी व्यक्तीकडे वयाचा कोणताही पुरावा नसेल,तर त्याच्या गुरु माँ ने दिलेले प्रमाणपत्रही पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते.तसेच 21 वर्षावरील तृतीय पंथीयाने वयाचा पुरावा म्हणून स्वत:च वय सांगणारे प्रमाणपत्र दिल्यास अधिकृत मानले जाते. पत्याचा पूरावा म्हणुन संबंधीत व्यक्तीच्या सध्याच्या निवासस्थानी आलेले टपालसुध्दा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. या कागदपत्रानुसार नोव्हेंबर 2021 मध्ये झालेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत म्हणजे मतदारनोंदणीच्या मोहीमेमध्ये राज्यभरातून मोठ्या प्रमाणात तृतीय पंथीयांची नोंदणी करुन घेण्यात आली होती.
महाराष्ट्रातील सर्व पात्र तृतीय पंथीय नागरीकांची मतदार यादित नोंदणी करणे हे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे उद्दिष्ट आहे. तेव्हा यंदाच्या तृतीय पंथी ओळख दिनाच्या निमित्याने तृतीय पंथीयांसाठी कार्यरत सामाजीक संस्थांनी आणि व्यक्तींनी या मोहीमेला सहकार्य करुन अधिकाधिक तृतीय पंथीयांनी या विशेष सप्ताहात मतदार नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,गडचिरोली संजय मीणा,यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here