– कुकडी गावाच्या ग्रामसभेत ठराव
The गडविश्व
गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील कुकडी गावाने अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ग्रामसभेचे आयोजन करून दारूविक्री करणाऱ्यांना विविध शासकीय योजनांपासून वंचित ठेवण्याचा ठराव एकमताने घेण्यात आला.
कुकडी येथील जिप शाळेत केशव कुमरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. गावात सात दारूविक्रेते सक्रिय असून अवैध दारूविक्रीमुळे गावाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दारूबंदी समिती गठीत करण्यात आली. अवैध दारूविक्री बंद करण्याचा ठराव घेण्यात आला. ग्रामसभेच्या नियमांचे उल्लंघन करून आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवल्यास त्या व्यक्तीस शासकीय योजना, प्रमाणपत्रांपासून वंचित ठेवण्याचे ठरविण्यात आले. वारंवार नियमांचे उल्लंघन करून गावात सिंधी, ताळी, दारू विक्री केल्यास ठरावानुसार त्याचे नाव निष्काशीत करण्याचे ठरविण्यात आल. तसेच त्या व्यक्तीला ग्रामसभेच्या वतीने गावाबाहेर काढण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
ग्रामसभेत झालेल्या ठरावानुसार गावात दारूबंदी असताना बाहेर गावाहून दारू पिवून कोणताही व्यक्ती गावात झगडे-भांडण केल्यास त्या व्यक्तीवर ५०० रुपये दंड ठोठावण्यात येईल, असाही निर्णय ग्रामसभेत सर्वानुमते घेण्यात आला. यावेळी कलीराम कुमरे, रघुनाथ कुमोटी, राजेंद्र कुमरे , पुरुषोत्तम किरंगे, पुरुषोत्तम पदा, साईनाथ किरंगे, दिवाकर पदा, रवींद्र किरंगे, घनशाम मडावी, महेश शेंदरे, बाजीराव किरंगे, यादव लाडे, घनशाम नवघडे, शुभम शेंदरे, मुक्तीपथच्या भारती उपाध्ये यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.