– गडचिरोली पोलिसांची कारवाई
The गडविश्व
गडचिरोली : तालुक्यातील अलोनी जंगलपरिसरात गडचिरोली पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने शनिवारी संयुक्त कारवाई करीत जवळपास ७५ हजार रुपयांचा मोहफुलाचा सडवा व दारू नष्ट करण्यात आली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलोनी गावात अनेक अवैध दारूविक्रेते सक्रिय आहेत. त्यामुळे येथे दारू पिण्यासाठी जवळपासच्या जेप्रा ,मेंढा, विश्रामपूर या गावांतील मद्यपी येत असतात. तसेच तालुक्यातील विविध गावातील किरकोळ दारूविक्रेत्यांनासुद्धा दारू पुरवठा केली जाते. त्यानुसार गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने जंगलपरिसरात शोधमोहीम राबवून हातभट्ट्या उध्वस्त केल्या. घटनास्थळावर १०० लिटर दारू, २० ड्रम मोहफूलाचा सडवा असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी सचिन मधुकर वडे या दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार धनराज चौधरी, स्वप्नील कुडावले, मपोशी सुजाता दोमरे यांनी केली. यावेळी मुक्तिपथ तालुका उपसंघटक रेवनाथ मेश्राम उपस्थित होते.