गडविश्व
मुंबई : झाडीपट्टी नाट्य ही विदर्भातील समृद्ध अशी प्रयोगात्मक कला असून जनसामान्यांत या कलेविषयी आत्मीयता आहे. या कलेच्या माध्यमातून जनमानसाचे मनोरंजन केले जाते, त्याचबरोबर प्रबोधनदेखील केले जाते. झाडीपट्टी नाट्यकलेचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनायातर्फे झाडीपट्टी नाट्य महोत्सवाचे आयोजन उद्या २३ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी, २०२२ या कालावधीत क्रीडा संकुल साले ता. देवरी (जिल्हा गोंदिया) येथे करण्यात आले आहे.
झाडीपट्टी नाटकांसाठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक गायक श्री. अनिरुद्ध बनकर यांचे ‘घायाळ पाखरा’ हे नाटक बुधवार उद्या २३ फेब्रुवारी, २०२२ रोजी आयोजित केलेले आहे. गुरुवार २४ फेब्रुवारी, २०२२ रोजी “लोक काय म्हणतील” हे अमर कुमार मसराम लिखित आणि सुनील अष्टेकर दिग्दर्शित नाटक आहे. शुक्रवार २५ फेब्रुवारी, २०२२ रोजी यश निकोडे लिखित व प्राध्यापक शेखर डोंगरे दिग्दर्शित “टाकलेले पोर” हे नाटक आहे. शनिवार २६ फेब्रुवारी, २०२२ रोजी दिपा पाटील लिखित आणि शेखर पटले दिग्दर्शित “लाखात एक लाडाची” लेक हे नाटक सादर होणार आहे. झाडीपट्टी नाट्य महोत्सव रसिकांसाठी विनामुल्य असून त्याचा लाभ सर्व रसिक प्रेक्षकांनी घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालकांनी केले आहे.