– तालुक्यातील एकलपूर येथील घटना, परिसरात हळहळ
The गडविश्व
देसाईगंज, ३१ जुलै : तालुका मुख्यालयापासुन ६ किमी अंतरावर असलेल्या एकलपुर येथील एका ११ वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना आज रविवार ३१ जुलै २०२२ रोजी सकाळच्या सुमारास घडली. या घटनेने गावात एकच खळबळ माजली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आशिष कालिदास दुफारे (११) असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक आशिष हा गावातीलच जिल्हा परिषद शाळेत इयत्ता ५ व्या वर्गात शिकत होता. आज सकाळी ५ वाजताच्या सुमारास खाटेवर झोपुनच होता त्यावेळेस मण्यार जातीच्या अती विषारी सापाने त्याला दंश केल्याची माहिती असून काही वेळातच त्याचा मृत्यू झाल्याचे कळते. अनपेक्षित झालेल्या सर्पदंशाने आशिषचा मृत्यू झाल्याने कुटुंबातील व्यक्ती यांना हादराच बसला आहे. त्याच्या या अशा मृत्यूने गावात शोककळा पसरली असून ११ वर्षाच्या बालकावर काळाने झडप घातल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.