दोन कोटी महिलांना सक्षम करणार : महिला बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

231

The गडविश्व
मुंबई : महाविकास आघाडीचे शासन माविमच्या माध्यमातून 2 कोटी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे काम करीत असून येत्या काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून अजून 2 कोटी महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास आज महिला बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सह्याद्री अतिथीगृह, येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित ‘सन्मान प्रेरणादायी महिलांचा’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाला महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष श्रीमती ज्योती ठाकरे, मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी आणि सारस्वत बँकेचे जनरल मॅनेजर समीर राऊत आदी उपस्थित होते.
मंत्री ॲड.ठाकूर म्हणाल्या, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी माविम नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांना मदत करत असते. महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा, बचत गटामधील महिलांमध्ये उद्योगजकतेचा विकास व्हावा, यासाठी माविम अनेक योजना राबवित आहे. सध्याच्या काळात महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. महिलांचे सक्षमीकरण म्हणजे केवळ आर्थिक सक्षमीकरण नाही, तर त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक सक्षमीकरण झाले पाहिजे. त्यांना मानसिक आधार दिला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
श्रीमती ज्योती ठाकरे म्हणाल्या, महिला आर्थिक विकास महामंडळ ही राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करणारी महत्त्वाची यंत्रणा आहे. सध्या राज्यात सुमारे दीड लाख बचतगटांची स्थापना ‘माविम’च्या वतीने करण्यात आली आहे. महामंडळाने आतापर्यंत विविध योजनेअंतर्गत 1.50 लाख बचतगटाची निर्मिती करुन 17.51 लाख महिलांचे संघटन उभे केले असून त्यापैकी सुमारे 8.50 लाख महिला विविध प्रकारचे व्यवसाय करीत आहेत. माविमने बचत गटांचे महाराष्ट्रामध्ये 361 फेडरेशन नोंदणीकृत केले आहे. यापैकी 80% फेडरेशन हे स्वबळावर सुरु आहेत.
श्रीमती पेडणेकर म्हणाल्या, माविम महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे काम करते. महिलांच्या मानसिक सक्षमीकरणासाठी काम होणे गरजेचे आहे. महिला सक्षम झाली तर कुटुंब सक्षम होते व देश सक्षम होतो.
या कार्यक्रमात सकाळच्या सत्रात माविममार्फत विविध कार्यक्षेत्रामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी “सेफ्टी ऑडीट” राबविण्यात आले. याची सुरुवात मुंबई शहरापासून केली जाणार आहे. मविम स्टाफ व महिलांसाठी अक्षरा या स्वयंसेवी संस्थेच्या साधन व्यक्तीमार्फत सेफ्टी ऑडिट या विषयाचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते “महिला सेफ्टी ऑडीट – (Women Safety Audit)” प्रशिक्षण पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत यांनी “महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांचे कार्य विषद केले. यावेळी १२ यशस्वी महिला उद्योजक / सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये पृथ्वी पाटील – ठाणे, लिला गजरा – पालघर, प्रतिभा सांगळे – बीड, संजीवनी ताडेगांवकर – अकोला, कल्पना किशोर दिवे – अमरावती, मनुताई सुर्यभान वरठी, न्या. निकिशा अशरफखान पठाण – चंद्रपूर, सुषमा केशव पवार – भंडार, मिना हिरालाल भोसले – धुळे, वनिता शिरिष हजारे – पुणे, श्रध्दा कांडोळे, यांना प्रशस्तीपत्रक व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here