The गडविश्व
गडचिरोली , २६ ऑक्टोबर : तालुक्यातील चांदाळा शेतशिवारात मुक्तिपथ तालुका चमू व गावसंघटनेच्या सदस्यांनी शोधमोहीम राबवून १५ हजार रुपये किंमतीचा दोन क्विंटल मोहफुलाचा सडवा नष्ट केला आहे.
चांदाळा येथे अवैध दारूविक्री केली जाते. सोबतच या गावातील ठोक विक्रेत्यांचा माध्यमातून गडचिरोली, मेंढा, खरपूंडी, राखी यासह परिसरातील विविध गावातील किरकोळ विक्रेत्यांना दारूचा पुरवठा होतो. या गावातील दारूविक्रीमुळे शांतता व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गावातील दारूविक्रेत्यांवर पोलिस विभागाच्या माध्यमातून अनेकदा कारवाई करूनही अनेकांनी आपला अवैध व्यवसाय बंद केला नाही. परिणामी या गावात परिसरातील मद्यपींची रांगच लागून असते. यामुळे विविध गावातील महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच मुक्तिपथ तालुका चमू व गाव संघटनेच्या सदस्यांनी गावातील शेतशिवारात शोधमोहीम राबवून विविध ठिकाणचा १५ हजार रुपये किमतीचा दोन क्विंटल मोहफुलाचा सडवा व साहित्य नष्ट केले. यावेळी तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवणाथ मेश्राम यांच्यासह मुक्तिपथ चमू उपस्थित होते. चांदाळा गावातील दारूविक्री बंद करण्यासाठी परिसरातील विविध गावांनी पुढाकार घेण्याचे मत सुजाण नागरिकांतून व्यक्त केले जात आहे.