– डॉक्टरवर गुन्हा दाखल करुन निलबिंत करण्याची पालकांची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, १३ जुलै : येथील महिला बाल रुग्णालयात डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे दोन वर्षीय बालक दगावल्याची झाल्याची घटना आज १३ जुलै रोजी उघडकीस आली. सदर बालकाचा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे झाला असल्याचा आरोप कुटुंबातील व्यक्तीने केला असून यास जबादार डॉक्टरवर गुन्हा दाखल करून निलंबीत करावे अशी मागणी मृतकाचे पालक आशिष प्रधाने, आजोबा भंजदेव यांनी केली आहे. सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नीचिन्ह उपस्थित केल्या जात आहे. चंद्रपूर जिल्हयातील सावली येथील पार्थ आशिष प्रधाने या २ वर्षीय बालकाला त्याच्या कुटुंबीयांनी पहाटे ४.०० वाजता उपचारासाठी गडचिरोली येथील महिला बाल रूग्णालयात दाखल केले. परंतु यावेळी एकही डॉक्टर हजर नसल्याचे कळते तर यावेळी डॉक्टर तारकेश्वर उईके यांची नेमणूक असतांना ते ड्युटीवर हजर नव्हते व वारंवार फोन करूनही डॉक्टर आले नाही असे कुटुंबातील व्यक्तीचे म्हणणे आहे. डॉक्टर उईके आज सकाळी ७. ४५ वाजता आले. तोपर्यंत बालकाचा मृत्यू झाला होता. दरम्यान या प्रकरणात मृतकांच्या कुटुंबीयांनी जिल्हा शल्य चिकित्सक व पोलीस स्टेशन गडचिरोली येथे जबादार डॉक्टरची तक्रार नोंदविली त्यानूसार चौकशी सुरू केली आहे व मृतक बालकाचे शव शवविच्छेदनसाठी पाठविले आहे.
सदर प्रकरणाबाबत खासदार अशोक नेते यांना माहिती देण्यात आली असता त्यांनी तात्काळ महिला रुग्णालय गाठून रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. वेळीच संबधित डॉक्टर यांचेवर कारवाई करावी असे आदेश रुग्णालय प्रशासनाला दिले. भविष्यात अशा घटनांना आळा बसावा असे निर्देशित केले. यावेळी चिमूर तालुका अध्यक्ष डॉ श्याम हटवादे , सावली तालुका अध्यक्ष अविनाश पाल, सावली तालुका महामंत्री सतीश बोम्मावार, निखिल सुरमवार, अम्रोजवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.