धक्कादायक : काेटगूल येथे अज्ञात व्यक्तीने घराला बाहेरून कुलूप लावून जाळण्याचा केला प्रयत्न

327

– वेळीच जाग आल्याने वाचला दाेघांचा जीव
The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील नक्षलग्रस्त अतिदुर्गम काेटगूल येथे अज्ञात व्यक्तीने घराच्या आत झोपलेल्यांना रात्रोच्या सुमारास बाहेरून कुलूप लावून घराला आग लावून जाळण्याची घटना काल शनिवारी मध्यरात्री घडली. घरात झाेपलेल्यांना वेळीच जाग आल्याने त्यांनी आरडाओरड करत खिडकी तोडून आपली सुटका केल्याने दोघांचा जीव वाचला आहे. मात्र हा प्रकारामागे कोणाचा हात आहे हे अद्याप कळू शकले नाही. मात्र सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, कोटगूल येथील मुख्य बाजारात असलेल्या बिंदियाबाई चिमनसिंग हारामी (वय ६५ वर्षे) यांच्या मालकीच्या घरी मिलिंद टेंभूरकर आपल्या पत्नीसह भाड्याने वास्तव्यास होते. काल शनिवारी रात्री टेंभूरकर कुटुंब झोपेत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोटारसायकल व घराला आग लावली. मात्र आग लावण्याच्या पूर्वी टेंभूरकर यांच्या खाेलीच्या दरवाजाला कुलूप लावले. आग लागल्याचे लक्षात येताच टेंभूरकर कुटुंब जागे झाले. त्यांनी आरडाओरड करत मदतीसाठी बाजूच्या भाडेकरूला आवाज दिले. त्यांच्या मदतीने घराची खिडकी तोडून हे दाम्पत्य कसेबसे घराबाहेर निघाले आणि त्यांनी आपला जीव वाचवला. मात्र, दुचाकी जळून खाक झाली. टेंभूरकर यांचे घरगुती सामानसह सोने-चांदी व मोटारसायकल, तसेच रोख रक्कम पकडून अंदाजे १ लाख ६० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. टेंभूरकर दाम्पत्याला घरात जीवंत पेटवून मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी कोण ? याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे. तसेच या आगीत गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घराची भिंत काेसळली. घरातील पूर्ण सामान जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सी.आर. भंडारी व कोटगूल पोलीस मदत केंद्रातील पोलीस अधिकारी आनंद जाधव, तलाठी, पोलीस पाटील, गावातील प्रतिष्ठित नागरिक, कोतवाल यांनी घटनास्थळ गाठून झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here