THE गडविश्व
मुंबई : राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. दिवसेंदिवस ही आकडेवारी वाढत असल्याचचे दिसत आहे. त्याच दरम्यान एक धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला दिलेला निधी (fund) खर्चच केला नसल्याचे समोर आले आहे. केंद्राने दिलेल्या एकूण निधी पैकी खूपच कमी निधीचा वापर महाराष्ट्र सरकारने वापरला असल्याचे पीआयबीने म्हटले आहे.
केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारसाठी प्रस्तावित एकूण 1,294 कोटी रुपये होते. त्या निधीपैकी केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला 683 कोटी रुपये देण्यात आले आणि त्यापैकी केवळ 0.32 टक्के निधीच वापरला असल्याचे पीआयबीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
पीआयबीने म्हटले, केंद्रीय मंत्रिमंडळाने 8 जुलै 2021 रोजी भारत कोविड -19 आपत्कालीन प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणा सज्जता पॅकेज टप्पा-III ला मंजूरी दिली. 1 जुलै 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत 23,123 कोटी रुपये किमतीची (केंद्रीय हिस्सा – 15,000 कोटी रुपये आणि रा्ज्याचा हिस्सा – 8,123 कोटी रुपये ही योजना राबविण्यात येणार आहे. ही योजना काही केंद्रीय क्षेत्र (CS) घटकांसह एक केंद्र पुरस्कृत योजना (CSS) आहे.
योजनेला मंजुरी मिळाल्यावर लगेचच केंद्र सरकारने कृतीशील उपाययोजना केल्या आणि 22 जुलै 2021 रोजी राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना केंद्राच्या वाट्यापैकी 15 टक्के निधी जारी केला. निधीचा दुसरा हप्ता ऑगस्ट 2021 मध्ये राज्यांना आगाऊ म्हणून लवकरच जारी करण्यात आला. 24 ऑगस्ट 2021 पर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियानाद्वारे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एकूण 6075.85 कोटी रुपये (केंद्रीय वाटा 50 %) आधीच जारी केले गेले आहेत.
नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असून ही आकडेवारी धडकी भरवणारी आहे. त्यामुळे राज्यात आता कठोर निर्बंध लावण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात मिनी लॉकडाऊन लावण्याचीही चर्चा होत आहे.
