The गडविश्व
नागपूर : येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका ४ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी आणि धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी जवळच्या भारकस इथली घडली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात असून जिल्हा परिषदेविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
५ दिवस आधी चार वर्षांची अंजली दुपारच्या वेळेस घराजवळ खेळत होती. त्याचवेळी भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने अंजली खाली पडली. अंजली जोरजोरात रडत होती, किंचाळत होती. कुत्र्यांनी तिच्या कमरेला, पाठिला आणि पायाचे चावे घेतले. भटक्या कुत्र्यांच्या या हल्ल्यात अंजली गंभीर जखमी झाली. अंजलीला सुरुवातीला गावाजवळच्या टाकळघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि त्यानंतर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान अंजलीचा दुर्देवी मृत्यू झाला.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या गावात तसेच आजूबाजूच्या परिसरात भटके कुत्रे आणि डुकरांची दहशत असून गावातील लहान मुलांवर आणि लोकांवर भटक्या कुत्र्यांनी अनेकदा हल्ले केले आहेत. असे असतानाही ग्रामपंचायत, पोलीस, जिल्हा परिषदेकडे तक्रारी करुनही लक्ष देत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी कर्ली आहे.