धक्कादायक : विष प्राशन करून एकाच कुटुंबातील ४ सदस्यांचा आत्महत्येचा प्रयत्न, महिलेचा मृत्यू

274

– तिघांची प्रकृती धोक्याबाहेर
The गडविश्व
ब्रम्हपुरी, २६ सप्टेंबर : आर्थिक विवंचनेत एकाच कुटुंबातील ४ सदस्यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना ब्रम्हपुरी शहरातील देलनवाडी भागातील सहकार कॉलनीत राहणाऱ्या ठाकरे कुटुंबीयांनी केली. सदर घटनेने एकच खळबळ उडाली असून यात कुटुंबातील महिलेचा मृत्यू झाला असून इतर तिघांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. गीता ठाकरे (५०) असे मृतक महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार रमाकांत दामोधर ठाकरे (५५) व पत्नी गीता ठाकरे (५०) हे दाम्पत्य मुलगा राहुल व मनोज सह ब्रम्हपुरी शहरातील देलनवाडी भागातील सहकार कॉलनीत भाड्याने फ्लॅट घेऊन वास्तव्यास होते. मागील काही दिवसांपासून कुटुंबातील कोणाच्याही हाताला काम नसल्याने घर सांभाळताना आर्थिक अडचण भासत होती. त्यामुळे कुटुंबातील सर्वच जणांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. शुक्रवार २३ सप्टेंबरच्या मध्यरात्री चौघांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा विचार केला व किटकनाशक एकत्र करून चौघांनीही एक एक ग्लास प्राशन केले. शनिवारी दिवसभर घरातच अत्यावस्थ अवस्थेत पडून होते. रविवारी पहाटे कुटुंबप्रमुख रमाकांत यांना थोडे बरे वाटू लागले असता उठून पाहिल्यानंतर दोन्ही, मुले जिवंत असल्याचे तर पत्नी बेशुद्ध अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले. दरम्यान, पहाटे ५ वाजता रमाकांतने तशाच अवस्थेत सायकलने लहान भावाचे घर गाठून त्याला ही कल्पना दिली. लहान भावाने लगेच आपल्या वाहनाने चारही जणांना ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी येथे भरती केले. मात्र उपचारादरम्यान, गीता ठाकरे यांचा मृत्यू झाला. तर रमाकांत ठाकरे यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून दोन्ही मुलांना गडचिरोली येथील रुग्णालयात पाठविण्यात आले व आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे कळते . पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत. सदर घटनेने मात्र एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here