– दोन विद्यार्थी किरकोळ जखमी, रुग्णालयात उपचार
The गडविश्व
लाखांदूर (Bhandara) : शाळेच्या मैदानात वीज कोसळल्याची धक्कादायक घटना लाखांदूर तालुक्यातील सोनी येथील लोकमान्य विद्यालयात घडली. यात दोन विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाले असून त्यांना लाखांदुरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले.
वैष्णवी अरविंद वावरे (१५), रा. मेंढा, आचल तेजराम वाघधरे (१५), रा. इंदोरा, ता. लाखांदूर अशी जखमी विद्यार्थिनींची नावे आहेत. सदर घटना मंगळवार २० सप्टेंबर ला दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. मंगळवारी दुपारची सुटी झाली यावेळी विद्यार्थी वर्गाबाहेर आले होते. दरम्यान वैष्णवी आणि आचल शाळेच्या मैदानाकडून वर्गखोलीकडे परत जात होत्या यावेळी अचानक वीज कडाडली आणि शाळेच्या मैदानावर कोसळली यामुळे या दोन्ही विद्यार्थिनी खाली कोसळून किरकोळ जखमी झाल्या. तात्काळ या दोघींनाही शिक्षकांनी लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून दोन्ही विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेची माहिती लाखांदूर येथील पोलिसांसह महसूल विभागाला देण्यात आली आहे.