THE गडविश्व
वृत्तसंस्था / राजनांदगाव : गडचिरोली जिल्हा सीमेलगत असलेल्या छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्यात काल शुक्रवारी नक्षलवाद्यांनी एका ३० वर्षीय इसमाची पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. तिजुराम बोगा (३०) असे हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.
सदर घटना नक्षलग्रस्त औंधी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निदेली गावात पहाटे घडली, असे मोहला-मानपूर क्षेत्राचे पोलीस उपविभागीय अधिकारी (SDOP) हरीश पाटील यांनी सांगितले. पाच नक्षल्यांनी तिजुराम बोगा यांच्या घरात घुसून त्याला जबरदस्तीने जवळच्या ठिकाणी नेले तेव्हा तिजुराम बोगाच्या पत्नीने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केले.
काही वेळाने तिजुराम बोगाचा मृतदेह गावशिवारात आढळून आला त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
घटनास्थळावरून एक नक्षल्यांचे पत्रक जप्त करण्यात आले आहे त्यात पीडित व्यक्ती पोलिसांना माहिती देण्याचे काम करीत असल्याचे नमूद करण्यात आले होते मात्र एसडीओपीनी पोलिसांशी त्याचा संबंध नसल्याचे सांगितले.