– प्रवासी सुखरुप, परिसरात दहशतीचे वातावरण
The गडविश्व
सुकमा : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या आंध्र प्रदेशातील चिंतूर परिसरात नक्षल्यांनी प्रवासी बसची जाळपोळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र बस मध्ये असलेले सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे.
२५ एप्रिलला नक्षल्यांनी दंडकारण्य बंदची हाक दिली होती. त्याआधीच काल रात्री १ वाजण्याच्या सुमारास आंध्र प्रदेशातील चिंतूर पोलीस स्टेशन परिसरात राज्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या कोंटापासून अवघ्या १५ किमी अंतरावर नक्षल्यांनी प्रवासी बसला थांबवून सर्व प्रवाशांना बस मधून उतरवून बसची जाळपोळ केल्याची घटना घडवली. बसची जाळपोळ केल्यानंतर नक्षली घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नक्षल्यांनी जाळलेली प्रवासी बस ओडिशातून हैदराबादला जात होती.
दंडकारण्य बंदची हाक नक्षल्यांनी दिली होती. याआधीच नक्षल्यांनी मोठी घटना घडवून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. घटनास्थळी नक्षलवाद्यांचे पत्रकेही सापडले आहेत.