The गडविश्व
मुंबई : नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या परिसरात कॅन्सर रूग्णालय उभारण्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत दिली.
नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या परिसरात कॅन्सर रूग्णालय लवकर उभारण्यासंदर्भात विधानसभा सदस्य समिर मेघे यांनी प्रश्न उपस्थित केला.
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले, नागपूर येथे शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या परिसरात कॅन्सर रूग्णालय उभारण्यासाठी २०१८ मध्ये २३ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला होता. सन २०१९ ला बांधकामाच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आणि सन २०२० मध्ये कोरोनाचे संकट आले त्या कालावधीत राज्य सरकारने बांधकामाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्या काळात हे काम बंद होते. सध्या हे काम नागपूरचीच एनआयटी ही संस्था करत असून या संस्थेने निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. हे काम दोन महिन्यात सुरू होणार आहे. कॅन्सर रूग्णालय उभारण्यासाठी लागणारा खर्च तसेच यंत्रसामग्रीसाठी खरेदी करण्यात येईल व लवकरात लवकर हे कॅन्सर रूग्णालय सुरू करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सभागृहात दिली.